'...तर नरेंद्र मोदी पुन्हा कसे पंतप्रधान होतील?'; जरांगेंचा सवाल, देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 10:28 PM2023-10-31T22:28:16+5:302023-10-31T22:37:38+5:30
आतापर्यंत मनोज जरांगेंनी राज्य सरकारवर, राज्यातील मंत्र्यांवर टीका केली होती.
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत न्यायमूर्ती शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकारण्यात आला. कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यास मंत्रिमंडळात मंजुरी दिली आहे. पण, मनोज जरांगे(पाटील) यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. रात्रीपर्यंत निर्णय घ्या अन्यथा मी जलत्याग करेन, असे मनोज जरांगे म्हणाले.
माध्यमाशी संवाद साधताना मनोज जरांगेंनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणीचा पुनरुच्चार केला. सरकारने विशेष अधिवेशन बोलावून यासंदर्भात निर्णय घ्यावा. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणारही नाही. संबंधित अधिकाऱ्याने ते वाटूसुद्धा नये, तुम्हाला ते वाटू दिले जाणार नाहीत. उद्याच्या उद्या सरकारने विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मनोज जरांगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी असेच वागेल तर कसे काय पुन्हा पंतप्रधान होतील? असा सवाल यावेळी मनोज जरांगेंनी उपस्थित केला. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना माझा नंबर द्या, मी त्यांना सांगतो राज्यातील परिस्थिती अत्यंत बेकार आहे ते',असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. पण अमित शाह यांना फक्त फडणवीसांना फोन लावता येतो असं म्हणत मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला. आतापर्यंत मनोज जरांगेंनी राज्य सरकारवर, राज्यातील मंत्र्यांवर टीका केली होती. मात्र आता थेट पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवर त्यांनी निशाणा साधला आहे.
दरम्यान, मराठा तरुणावर खोटे गुन्हे दाखल करू नका, महाराष्ट्र शांत आहे, सरकारचे लोक गोंधळ घालत आहेत. तरुणांवर गुन्हे दाखल झाले तर मी स्वत: बीडमध्ये जाऊन एसपी, जिल्हाधिकाऱ्यांसमोर बसेन. त्यावेळी ५ लाख येतील, अथवा १० लाख आंदोलक येतील, मला त्याची काळजी नाही. लोकशाहीच्या माध्यमातून आम्हाला आंदोलन करु द्या, नाहीतर उद्या मी स्वत: तुमच्याकडे पाहिल्याशिवाय राहणार नाही. मराठे काय असतील हे तुम्हाला मग कळेल. मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास जशासतसे उत्तर देऊ, असा इशाराही मनोज जरांगेंनी यावेळी दिला.
शांततेत आंदोलनाचा सर्वांना अधिकार- देवेंद्र फडणवीस
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्यांना सक्त इशारा दिला आहे. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. मात्र हिंसेला कुठेही थारा दिला जाणार नाही, असं गृहमंत्र्यांनी बजावलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे. त्याबाबत राज्य सरकार सकारात्मकतेने पावलं उचलत आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत आश्वासन दिलं आहे. त्यानुसार राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत बांधिल आहे. त्याबाबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.