आधीच खड्डे, त्यात दरवाढीचे विघ्न
By admin | Published: August 12, 2016 04:17 AM2016-08-12T04:17:47+5:302016-08-12T04:17:47+5:30
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार आहे. महामार्ग क्रमांक ६६वर खड्डे पडल्यामुळे आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना गावी
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार आहे. महामार्ग क्रमांक ६६वर खड्डे पडल्यामुळे आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना गावी वेळेवर पोहोचता यावे यासाठी परिवहन विभागाने पर्यायी मार्ग सुचविले आहेत. मात्र हे मार्ग फार लांबचे ठरत असल्याने एसटीलाही त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून कोकणात जाणाऱ्या मार्गांवर तात्पुरती भाडेवाढ केली जाणार आहे.
गणेशोत्सव काळात कोकणातील वाहतूक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वर खड्डे पडल्याचे निदर्शनास आणण्यात आले. या मार्गाची २५ आॅगस्टपर्यंत दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी मार्गांचा विचार बैठकीत करण्यात आला. तसे झाल्यास वाहतूककोंडीची समस्या सुटेल व प्रवाशांना वेळेत गावी पोहोचता येईल, असा बैठकीत विचार मांडण्यात आला. त्यानुसार रावते यांनी एसटी प्रशासनाला तशा सूचना दिल्या. या सूचनांनुसार मुंबई ते चिपळूणपर्यंत जाणाऱ्या बस खोपोली, पाली मार्गे माणगाव, महाड, चिपळूणपर्यंत जातील. तर चिपळूणच्या पुढे रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये जाणाऱ्या एसटी बसना पुणे, सातारा, उंब्रज (कुंभार्ली घाट) मार्गे जाण्याचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र या पर्यायांमुळे एसटी बसनाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या मार्गांवर गणेशोत्सव काळात भाडेवाढ करण्याचा विचार केला जात आहे. मुंबई ते चिपळूण प्रवासात पर्यायी मार्गाचा वापर केल्यास २५ किलोमीटरचा अधिक प्रवास होत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना प्रत्येक तिकिटामागे २५ रुपये जादा मोजावे लागतील. तर मुंबईतून रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत पर्यायी मार्गाने प्रवास झाल्यास ११0 किलोमीटर जादा प्रवास होत असून तिकिटामागे ११0 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. स्थितीचा आढावा २५ आॅगस्टपर्यंत घेतला जाईल आणि पर्यायी मार्गांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. ही भाडेवाढ ही १ ते ५ सप्टेंबरपर्यंत लागू राहील. (प्रतिनिधी)
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीकडून १,७५0 ग्रुप बुकिंग सोडण्यात आल्या आहेत. त्याच्या २000 पेक्षा जास्त फेऱ्या होणार असून १ ते ५ सप्टेंबरपर्यंत त्या धावतील. १0 आॅगस्टपर्यंत १,९५२ फेऱ्यांच्या ग्रुप बुकिंगचे आगाऊ आरक्षण झाले आहे. पर्यायी मार्गावरून या बस धावल्या तर ग्रुप बुकिंगमधील प्रत्येक प्रवाशाकडून जदा भाडे घेतले जाणार आहे.
त्याचप्रमाणे ३ ते ४ सप्टेंबर रोजीही नियोजित वेळापत्रकाव्यतिरिक्त एसटीकडून जादा बस सोडण्यात येणार आहेत. या बसही पर्यायी मार्गावरून गेल्यावर प्रवाशांना अधिक भाडे द्यावे लागेल. ज्यादा बस सोडण्याची व्यवस्था मुंबई सेंट्रल, परेल, कुर्ला नेहरूनगर, ठाणे (खोपट) आणि बोरीवली बस स्थानकातून करण्यात आली आहे.
1महामार्ग क्रमांक ६६ हा जुना एनएच-१७ म्हणून ओळखला जातो. हा मार्ग मुंबई-पनवेल-पेण- माणगाव-महाड आणि पुढे जातो. मात्र या मार्गाचा वापर न करण्यावरच विचार केला जात आहे.
2गणेशोत्सवात कोकणात जाताना सध्याचा महामार्ग क्रमांक ६६ चा वापर केल्यास रत्नागिरी, सिंधुदुर्गापर्यंतचा प्रवास हा १८ ते २0 तासांपर्यंतचा होऊ शकतो. त्यामुळे हा प्रवास टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न केला जात आहे.
एसटी बसना टोलमधून सूट द्या : गणेशोत्सव काळात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून अवजड वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाने जाणाऱ्या एसटी बसना राष्ट्रीय व राज्य मार्गावरील टोलमधून सूट मिळावी, अशी मागणी दिवाकर रावते यांनी महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.