आधीच मिळाल्या उत्तरपत्रिका!
By admin | Published: May 2, 2015 12:51 AM2015-05-02T00:51:45+5:302015-05-02T00:51:45+5:30
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच उत्तरपत्रिकेतील कोरे पाने मिळाली होती. त्यावर आधीच उत्तरे लिहून विद्यार्थ्यांनी ती पाने संबंधित
अमरावती : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच उत्तरपत्रिकेतील कोरे पाने मिळाली होती. त्यावर आधीच उत्तरे लिहून विद्यार्थ्यांनी ती पाने संबंधित कर्मचाऱ्याला दिली. त्यानंतर ती पाने बिनबोभाटपणे उत्तरपत्रिकेला जोडण्यात आल्याची धक्कादायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पीडीएमसीतील गुणवाढ प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, सोमवारी या चौकशीचा अहवाल अधिष्ठात्यांसमोर सादर होणार आहे. त्यानंतर दोषीवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शहरातील प्रख्यात डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात आणखी एक गुणवाढ प्रकरण उघडकीस आले आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पाच विद्यार्थ्यांनी परीक्षेत गुणवाढ करून घेतल्याचे मूल्यांकनादरम्यान लक्षात आले आहे. हा प्रकार प्राध्यापकांनी अधिष्ठाता दिलीप जाणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली. चौकशी नुकतीच पूर्ण झाली असून लवकरच अहवाल अधिष्ठाता दिलीप जाणे यांच्या समक्ष ठेवला जाईल. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविली जाईल. मात्र, पीडीएमसीतील एका कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेमधील कोरी पाने देऊन त्यावर उत्तरे लिहून आणण्यास सांगितले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोऱ्या पानावर प्रश्नांची उत्तरे लिहून संबंधित कर्मचाऱ्यांच्या सुपूर्द केली होती. त्याने ही पाने उत्तरपत्रिकेला जोडली. (प्रतिनिधी)