एसटी कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास पर्यायी नोकरी, नियमांमध्ये सुधारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 06:27 AM2022-06-06T06:27:37+5:302022-06-06T06:28:30+5:30
राज्य परिवहन महामंडळ विभागाने नुकतेच त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे.
मुंबई : एसटीच्या सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास त्याला पर्यायी नोकरी दिली जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळ विभागाने नुकतेच त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे.
उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्य परिवहन महामंडळाने नियमांमध्ये सुधारणा केली आहे. सेवाकार्यकाळात एखाद्या कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास अशा कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी आणि अपंगत्वाच्या दाखल्याची पूर्तता चार आठवड्यांच्या मुदतीत करून घ्यावी, असे निर्देश दिले आहेत. सेवेत असताना दिव्यांगता/ विकलांगता आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केल्यास ते ‘दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६’च्या कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अपंगत्वाच्या दाखल्याची खातरजमा करावी. अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्याच्या दिनांकापासून दोन आठवड्यांच्या मुदतीत करण्यात यावा. प्रमाणपत्राची तपासणी केल्यानंतर ते योग्य असल्यास पर्यायी नोकरी देण्याबाबतची प्रक्रिया सुरू करावी.