खड्डे चुकविण्यासाठी वापरा पर्यायी मार्ग; पुणे बायपास, कोल्हापूर मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 02:26 AM2018-09-03T02:26:29+5:302018-09-03T07:38:41+5:30
गणरायाच्या स्वागतासाठी कोकणात रस्ते मार्गे जाणाऱ्या प्रवाशांकडून पुणे बायपास आणि कोल्हापूर मार्ग हा चांगला पर्याय उपलब्ध आहे.
मुंबई : गणरायाच्या स्वागतासाठी कोकणात रस्ते मार्गे जाणाऱ्या प्रवाशांकडून पुणे बायपास आणि कोल्हापूर मार्ग हा चांगला पर्याय उपलब्ध आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी आणि खड्डे चुकविणे शक्य होणार असून, प्रवाशांचा प्रवास काही अंशी सुखदायी होईल, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्ग, पाली-खोपोली मार्ग, सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे महामार्ग या मार्गांवरून चाकरमानी गावी जातात. मुंबई गोवा महामार्गावर रस्त्याची कामे सुरू असल्यामुळे वाहतूककोंडी होण्याची शक्यता असते. मुंबई-कोकण मार्गावरील रस्त्यांची चाळण झाल्यामुळे कोकणात जाणाºया खासगी वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्यावर भर दिला आहे.
राज्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) रश्मी शुक्ला यांनी गणेशोत्सव काळातील रस्ते मार्गावर करण्यात येणाºया उपाययोजनांबाबत आढावा घेतला. या बैठकीस वाहतूक विभागाचे पोलीस अधीक्षक विजय पाटील उपस्थित होते. या वेळी शुक्ला यांनीदेखील मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे नाराजी व्यक्त करत कोकणात जाणाºया रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यासंदर्भात संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या.
दादर येथील खासगी वाहतूक करणाºया चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितले की, पेणपर्यंत नेहमीच्या मार्गाने आम्ही प्रवासी वाहतूक
करतो. मात्र, तळ कोकण, कणकवली, मालवणमध्ये जाण्यासाठी मुंबई-कोल्हापूर-बंगळूर महामार्ग वापरून गगनबावडा, तळेरे मार्गे कणकवली असा प्रवास पूर्ण करतो. बुकिंग करताना प्रवाशांना याची कल्पना देण्यात येते. प्रवाशांनी देखील खड्ड्यांच्या झटक्यांपासून मुक्तता मिळविण्यासाठी या पर्यायी मार्गाला चांगला प्रतिसाद दिलाआहे.
डबलडेकर एक्स्प्रेसला १२ दिवस अतिरिक्त बोगी
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव डबलडेकर एक्स्प्रेसला १२ दिवस अतिरिक्त बोगी जोडण्याच्या निर्णयामुळे लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी जाणाºया चाकरमान्यांना कोकण रेल्वेने दिलासा दिला. त्यामुळे ९ ते २२ सप्टेंबर या काळात डबलडेकर एक्स्प्रेस अतिरिक्त बोगीसह धावणार आहे. ट्रेन क्रमांक ११०८५ लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव डबलडेकर एक्स्प्रेसला ९, १२, १४, १६, १९ आणि २१ सप्टेंबर प्रत्येकी दोन वातानुकूलित चेअरकार जोडण्यात येईल. ट्रेन क्रमांक ११०८६ मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस डबलडेकर एक्स्प्रेसला १०, १३, १५, १७, २० व २२ सप्टेंबर रोजी प्रत्येकी दोन वातानुकूलित बोगी जोडला जाणार आहेत.
दरम्यान, पश्चिम रेल्वेतर्फे मुंबई-अहमदाबाद डबलडेकर एक्स्प्रेसला सोमवार, ३ सप्टेंबरपासून एक वातानुकूलित डबल डेकर बोगी कमी करण्यात येईल. ३१ आॅक्टोबरपर्यंत मुंबई-अहमदाबाद डबलडेकर एक्स्प्रेस १३ बोगीसह धावणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
हे मार्ग वापरणे सोईस्कर...
- नागोठणे ते महाडपर्यंत जाणाºयांनी मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करून खोपोली राज्य महामार्ग ९२ वरून पालीमार्गे नागोठण्याला पोहोचावे.
- महाड ते चिपळूण जाणारे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गे शिरवळ फाट्यावरून राज्य महामार्ग ७० वरून महाड किंवा पोलादपूरवरून
खेड येथे जाता येईल.
- चिपळूणच्या पुढे जाणारे वरीलपैकी कोणताही किंवा मुंबई कोल्हापूर बंगळूर द्रुतगती महामार्ग वापरून उंब्रज फाट्यावरून पाटणमार्गे चिपळूण मार्गाचा वापर शक्य आहे.
- तळकोकण कणकवली मालवणला जाण्यासाठी मुंबई कोल्हापूर बंगरुळ द्रुतगती महामार्ग कोल्हापूर शहरातून गगनबावडामार्गे वैभववाडी तळेरे मार्गाचा वापर करा.