"आमच्यावर टीका झाली असली तरी एका गोष्टीचं बरं वाटलं की..."; सुप्रिया सुळेंचा अमित शाहांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 07:17 PM2024-03-06T19:17:12+5:302024-03-06T19:17:34+5:30
अमित शाह यांनी नुकताच दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा केला.
Supriya Sule vs Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येऊन त्यांनी बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर एक चकार शब्ददेखील काढला नाही. केंद्र सरकार ईस्ट इंडिया कंपनीसारखे सर्व राजकीय पक्षांना उद्ध्वस्त करत आहे. पक्ष फोडा, घरं फोडा या पॉलिसी विरोधात व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आगामी निवडणुका महत्वाच्या असणार आहेत. आमच्यावर काहीही टीका झाली असली तरी मला एका गोष्टीचं बरं वाटलं की, आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांच्या दौऱ्यावर खोचक टोला लगावला. त्या पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांची बैठक आज पुण्यात आयोजित करण्यात आली होती. बूत कमिटी आणि प्रचार कशाप्रकारे करायचा या संदर्भात आज बैठकीत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यापूर्वी अनेक निवडणुका एकत्रित लढलेले आहे. मागची ५५ वर्षे महाराष्ट्रात कुणीही नेता आला तर तो शरद पवारांना नावं ठेवतोच, कारण त्याशिवाय हेडलाईनच होत नाही. त्यामुळे अमित शाह आले होते आणि त्यांनी शरद पवार साहेबांवर टीका केली. जर टीका केली नसती तर हेडलाईन झाली नसती."
"विधानसभेत झालेली मारामारी, पोलीस स्टेशनमध्ये झालेला गोळीबार, कोयता गँग व ड्रग्सवर अमित शाह बोलले असते तर आनंद झाला असता. गेल्या ६० वर्षांत पवार साहेबांवर अनेकांनी टिका केली पण ते काम करत राहिले, कुणाला उत्तर दिले नाही. सध्या आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. लोकांच्या सुख दुःखात आम्ही सहभागी होतो. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आहोत. आता लोकसभा निवडणूक आहे, त्यामुळे आम्ही कामाला लागलो आहोत. नेहमीप्रमाणे ज्येष्ठांच्या आशीर्वादाने मी प्रचार करते आहे. ज्याला प्रचार करायची इच्छा असेल त्यांनी प्रचार करावा. परंतु निवडणूक ही विचारांनी लढली जाते. आमच्यावर जी काही टीका झाली असली तरी मला एका गोष्टीचं बरं वाटलं की, आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. तरी सुद्धा अमित शाहा यांनी जी टीका केली तो त्यांचा हक्क आहे," असा टोला त्यांनी लगावला.