"मी बंडखोरांचे कार्यालय फोडायला जाऊ का?" चंद्रकांत खैरेंच्या हतबल उद्गारामुळे संघटनेच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 07:09 AM2022-06-27T07:09:18+5:302022-06-27T07:09:52+5:30
जिल्ह्यात सामान्य नगरसेवक फुटला तरी त्याच्या घरावर हल्ले व्हायचे, या वेळी संघटना इतकी शांत कशी? या प्रश्नावर संघटना कशासाठी आहे? पदाधिकारी काय करीत आहेत, असे म्हणत त्यांनी जिल्हाप्रमुख दानवे आणि इतर पदाधिकाऱ्यांकडे इशारा केला.
औरंगाबाद : जिल्ह्यात शिवसेनेचा एखादा नगरसेवक, पदाधिकारी जरी फुटला तरी त्याच्याविरोधात रान पेटविले जायचे. शिवसैनिक रस्त्यावर उतरून त्या बंडखोरासह कुटुंबीयांना सळो की पळो करून सोडायचे, मात्र, आता जिल्ह्यातील पाच आमदारांनी बंड करूनही स्थानिक पातळीवर शांतताच आहे. त्याबद्दल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी रविवारी नाराजी व्यक्त केली. नेता म्हणून मी बंडखोरांची कार्यालये फोडायला जाऊ का, असा उलट सवाल करीत संघटनेतील आळीमिळी गुपचिळीला वाचा फोडली.
जिल्ह्यात सामान्य नगरसेवक फुटला तरी त्याच्या घरावर हल्ले व्हायचे, या वेळी संघटना इतकी शांत कशी? या प्रश्नावर संघटना कशासाठी आहे? पदाधिकारी काय करीत आहेत, असे म्हणत त्यांनी जिल्हाप्रमुख दानवे आणि इतर पदाधिकाऱ्यांकडे इशारा केला.
मला ५० कोटींची ऑफर
मला कुणकुण लागली होती. मी थेट औरंगाबादकडे निघालो होतो. मोबाइल बंद केला होता. शिंदे गटाकडून संपर्क झाला. पण मी कुणाचेही नाव घेऊ इच्छित नाही. मला ५० कोटींची ऑफर होती, गद्दार म्हणून जगायचे नाही.
- उदयसिंग राजपूत, शिवसेना आमदार, कन्नड
शिरसाटांनी बांधली बंडखोरांची ‘मोट’
औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारांच्या बंडखोरीचे सूत्रधार आ. संजय शिरसाट असून त्यांनीच पाच आमदारांची बंडखोरीसाठी ‘मोट’ बांधल्याचा खळबळजनक दावा या वेळी चंद्रकांत खैरे यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी घरगुती कामांसह दिवाळीला भेटवस्तू देत मतदारसंघातील कामांना कोट्यवधींचा निधी देऊन आमदारांना आपलेसे केल्याचेही खैरेंनी नमूद केले.