अमेरिकन कुलगुरू बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:40 AM2017-07-30T00:40:03+5:302017-07-30T00:40:03+5:30
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांना ते अमेरिकन नागरिक असल्याचे सिद्ध झाल्याने कुलपती व राज्यपाल
विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांना ते अमेरिकन नागरिक असल्याचे सिद्ध झाल्याने कुलपती व राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पदावरून आज तत्काळ बडतर्फ केले. डॉ. दाणी यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ १३ आॅगस्ट रोजी संपणार असून त्याच्या केवळ १५ दिवस आधी त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
डॉ. दाणी यांची १३ आॅगस्ट २०१२ रोजी नियुक्ती केली होती. गेल्या वर्षी तत्कालीन कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी डॉ. दाणींविरुद्ध अमेरिकन नागरिकत्व व इतर मुद्द्यांवरील तक्रारींची माहिती राज्यपालांना दिली. त्यानंतर चौकशीची चक्रे फिरली. डॉ. दाणी अमेरिकेचे नागरिक आहेत काय हे जाणून घेण्यासाठी राज्यपालांनी राज्याचे महाधिवक्ते, राज्याचा विधी व न्याय विभाग आणि परराष्ट्र मंत्रालयाची मते मागविली. त्यात ते अमेरिकन नागरिक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज बडतर्फीची कारवाई करण्यात आली.
केवळ नागरिकत्वाबाबतच नव्हे तर डॉ. दाणी यांच्याविरुद्ध अन्य मुद्द्यांवरही काही कार्यकारी परिषद सदस्यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. आता दाणी यांच्या बडतर्फीमुळे सदर तक्रारींबाबत राज्यपाल काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे. राजभवनातून जे प्रसिद्धिपत्रक काढण्यात आले त्यात ‘विदेशी’च्या मुद्द्यावरून डॉ. दाणी यांच्याविरुद्ध कारवाई होणार का याचा उल्लेख नाही. या विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंची निवड प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.
१५ दिवस आधी बडतर्फी करून काय साधले?
डॉ. दाणी अमेरिकन नागरिक असल्याचे त्यांच्या मुलाखतीवेळी समोर आले नव्हते का, विद्यापीठ कायद्यानुसार आपण भारतीय नागरिक असल्याबाबतचे पत्र नियुक्तीच्या एक वर्षात दिले होते की नाही, त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या केवळ १५ दिवस आधी बडतर्फी करून काय साधले, अशा शंका आता उपस्थित झाल्या आहेत.
याबाबत डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या प्रतिक्रियेसाठी त्यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.