आमगाव आरोग्य केंद्र १५ दिवस अंधारात, उपचार ठप्प!
By admin | Published: September 19, 2016 03:07 AM2016-09-19T03:07:30+5:302016-09-19T03:07:30+5:30
आमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गेले १५ दिवस अंधारात
सुरेश काटे,
तलासरी- तालुक्यातील आमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गेले १५ दिवस अंधारात असून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे आदिवासी रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहत आहेत. विद्युत पुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून तांत्रिक दोषामुळे बंद असून तो सुरु करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याने कोणतीही उपाय योजना न केल्याने रुग्णावर उपचार करणे कठीण झाले आहे. शनिवारी रात्री आच्छाड येथील लक्ष्मी वागलोडे हि उपचारा साठी आरोग्य केंद्रात आली पण विजेअभावी तिच्यावर उपचार करता आले नाहीत या वेळी संतापलेल्या नातेवाईकांनी तलासरी पंचायत समितीचे सभापती वनशा दुमाडा यांना परिस्थिती दाखविली असता पंधरा दिवसा पासून आरोग्य केंद्रातील वीज तांत्रिक कारणामुळे बंद असल्याचे दिसून आले. तसेच सौर उर्जेवरील वीजपुरवठाही बंद असल्याचे समजल.े त्यामुळे आदिवासी रुग्णांना उपचारासाठी अनेक अडचणी आल्या तसेच काही रुग्णांना उपचार न करता परत पाठविण्यात आले त्यामुळे आमगाव आरोग्य केंद्र असून ते कुचकामी ठरले आहे.
जीवल्या धाकट डावरे रा, वरवाडा या सर्प दंश झालेल्या रुग्णास आरोग्य केंद्रात योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला, सरिता सुरेश धापसा वय १६ वर्षे हिला सर्प दंश झाल्यावर उपचारासाठी आमगाव आरोग्य केंद्रात आणले पण तिच्यावर दोन तास उपचार न करता बसवून ठेवले सुदैवाने सर्प विषारी नव्हता त्यामुळे तिचे प्राण वाचले. आमगाव आरोग्य केंद्रात डॉक्टरची व कर्मचारी याची मनमानी चालते रु ग्णावर उपचार केले जात नाहीत रुग्णाच्या जीवाशी खेळले जाते असे आमगाव चे उपसरपंच राजेश थापड व वरवाडाच्या सरपंच सैनु ठाकरे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेंद्र मडके यांच्या निदर्शनात आणून दिले.
आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे वैद्यकीय अधिकारी चंद्रमुनी झडते यांनी लोकमतला सांगितले. या बाबत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारले असता आमगाव आरोग्य केंद्रात पूर्ण कर्मचारी असून सुविधासाठी निधीची हि तरतूद करण्यात आली असल्याचे सांगून खोटी माहिती का देता असे विचारून तालुका अधिकाऱ्यांनी झडते याना फैलावर घेतले. आमगाव आरोग्य केंद्रात रु ग्णवाहिका नाही आरोग्य केंद्रासाठी असलेली रुग्णवाहिका जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मागवून घेऊन नादुरुस्त गाडी आरोग्य केंद्राला दिल्याने तिचा काहीही फायदा रुग्णांना होत नाही. आमगाव आरोग्य केंद्रात आदिवासी रुग्णावर योग्य ते उपचार केले जात नाहीत अधिकारी कर्मचारी यांची मनमानी चालते आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसतात त्यामुळे आमगाव आरोग्य केंद्र असून नसल्यासारखे असल्याने या भागातील आदिवासी रु ग्णांना वापी येथे जाऊन महागडे उपचार करून घ्यावे लागतात. तलासरी पंचायत समितीला आयएसओ मानांकन असतांना तिच्या अखत्यारीतील आरोग्य केंद्राच्या दुरावस्थेमुळे या मानांकनाबाबत शंका निर्माण होते आहे.
>पुरेसे कर्मचारी आरोग्य केंद्रात आहेत निधीची तरतूदही आरोग्य केंद्राला आहे कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती बाबत समज देण्यात आली आहे.
- डॉ.सुरेंद्र मडके, तालुका वैद्यकीय अधिकारी
>केंद्रात अधिकारी व कर्मचारी यांची मनमानी चालते आदिवासी रुग्णांना उपचार मिळत नाहीत.
- वनशा दुमाडा, सभापती पंचायत समिती तलासरी
>ग्रामसभेला आरोग्य अधिकारी उपस्थित राहत नाहीत आदिवासी रुग्णांना उपचार मिळत नाहीत.- राजेश थापड, उपसरपंच आमगाव