अमळनेरमध्ये पाण्यावरून दंगल
By admin | Published: September 13, 2014 02:39 AM2014-09-13T02:39:01+5:302014-09-13T02:39:01+5:30
पाण्यावरून झालेल्या वादातून शुक्रवारी वासरे येथे दंगल झाली. हल्लेखोरांनी एका महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला
अमळनेर (जि.जळगाव) : पाण्यावरून झालेल्या वादातून शुक्रवारी वासरे येथे दंगल झाली. हल्लेखोरांनी एका महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात १२ जण जखमी झाले.
३५ जणांविरूद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत चार जणांना अटक झाली. गावात तणावपूर्ण शांतता आहे. ७ सप्टेंबरला वासरे येथील सागर पाटील, शंकर रघुनाथ पाटील यांना मोटार लावून बांधकामासाठी पाणी वापरू नका. त्यामुळे इतरांना पाणी मिळत नाही, असे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण दयाराम पाटील यांनी सांगितले होते. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर ९ सप्टेंबरला शंकर पाटील व इतरांनी प्रवीण पाटील यांना मारहाण केली.
याप्रकरणी मारवड पोलिसांत २६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. सर्व संशयितांना गुरूवारी अटक झाली व नंतर त्यांची जामीनावर मुक्तता झाली.
आरोपींची मुक्तता होताच त्याचे गावात पडसाद उमटले. शुक्रवारी सकाळी प्रवीण पाटील यांच्यासह आरोपींनी आशाबाई गुलाबराव पाटील (३०) यांच्या घरात घुसून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोरांनी न्यू प्लॉट भागात जाऊन ग्रामस्थांना लाठ्याकाठ्या, सळईने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे गावात घबराट पसरून एकच पळापळ सुरू झाली. त्याचदरम्यान जमावाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही दगडफेक केली. वाहनचालक दत्तात्रय पाटील यांना मारहाण केली.
हल्लेखोरांनी चंद्रभान साहेबराव पाटील, देवीदास साहेबराव पाटील, सागर शंकर पाटील, अशोक रघुनाथ पाटील, रवींद्र जुगराज पाटील, लिलाधर खंडू पाटील, दत्तात्रय जगन्नाथ पाटील , लोटन लिलाधर पाटील, शंकर रघुनाथ पाटील,
जिजू खंडू पाटील, भालचंद्र
शंकर पाटील, सुनील खंडू पाटील, विजय झिपरू पाटील, सुशीलाबाई किसन पाटील, मंगल शंकर पाटील यांना जखमी केले. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक बोत्रे यांनी वासरे गाव गाठले. आशाबाई पाटील यांनी मारवड पोेलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून ३५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)