‘अमंगळ’वार, २१ ठार; राज्यभरात एकाच दिवशी अनेक अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 06:21 AM2023-05-24T06:21:29+5:302023-05-24T06:21:43+5:30

बुलढाण्यात एसटी-कंटेनरची धडक; अमरावतीत कुटुंबावर काळाचा घाला 

'Amangal' War, 21 killed; Multiple accidents on the same day across the state | ‘अमंगळ’वार, २१ ठार; राज्यभरात एकाच दिवशी अनेक अपघात

‘अमंगळ’वार, २१ ठार; राज्यभरात एकाच दिवशी अनेक अपघात

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क 
सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) : एसटी बस आणि कंटेनरमध्ये समोरासमोर धडक होऊन बसमधील चार प्रवाशांसह कंटेनरचालक व बसचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नागपूर-छत्रपती संभाजीनगर मार्गावर सिंदखेड राजा तालुक्यातील पळखेड चक्का गावानजीक मंगळवारी घडली. जखणी २८ प्रवाशांवर उपचार सुरु आहेत. 

मेहकर आगाराची बस ही पिंपरी चिंचवड येथून मेहकरकडे जात होती, तर नागपूरकडून येणारा कंटेनर हा जालन्याकडे जात होता. सिंदखेड राजा शहरापासून आठ किमी अंतरावर असलेल्या पळसखेड चक्का गावनजीक बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस समोरून येणाऱ्या कंटेनरवर जाऊन धडकली. 

अमरावतीमध्ये भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत टेम्पोमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील इटकी फाट्याजवळ सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. मृतांमध्ये तरुण पती-पत्नी, त्यांची नऊवर्षीय मुलगी, आई व पुतण्याचा समावेश आहे. या अपघातात त्याच कुटुंबातील आठ जण जखमी झाले आहेत. 

घाटात पिकअप कोसळून चार ठार
तळोदा (जि. नंदुरबार) : धडगाव ते तळोदा रस्त्यावर चांदसैली घाटात पिकअप वाहनाला अपघात होऊन चाैघे ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अपघातात तिघे जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. धडगाव तालुक्यातील वावी येथील तुकाराम दिवाल्या ठाकरे हे गावातील काहींसोबत घरासाठी लागणारे काैल आणि पत्रे घेण्यासाठी पिकअपने तळोदा येथे येत होते. 

कंटेनर ६ गाड्यांवर आदळला; १ ठार
खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सोमवारी रात्री ११.१५ च्या   सुमारास एका कंटेनरचे अचानक ब्रेक फेल झाले. या कंटेनरने तब्बल सहा गाड्यांना भीषण धडक दिली. या अपघातात एक ठार, तर पाच जण जखमी झाले. सुभाष पंढरीनाथ चौगुले (४५, रा.वाशी, नवी मुंबई) असे अपघातातील मृताचे नाव आहे. 

‘समृद्धी’वर अपघात, १ ठार
सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) : समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच असून, मंगळवारी पहाटे २:१५ वाजता खासगी प्रवासी बस दुभाजकाला धडकली. यात बसच्या क्लीनरचा मृत्यू झाला असून, ८ प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचे महामार्ग पोलिसांचे म्हणणे आहे.

दुचाकी-जीपच्या अपघातात पिता-पुत्र ठार
गंगाखेड (जि. परभणी) : गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव परिसरात राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी व जीपचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पिता-पुत्र जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. 

अंत्यविधीहून परतताना अपघात, दोन ठार
वडकी (जि.यवतमाळ) : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोन जण ठार झाले. ही घटना मंगळवारी दुपारी कारेगाव पुलाजवळ घडली. दत्तूजी ननकटे (रा.सिंधी मेघे, जि.वर्धा) व फकीरचंद बुरबादे (रा.सालोड, जि.वर्धा) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही मारेगाव तालुक्यातील मार्डी येथून नातेवाइकाचा अंत्यविधी आटोपून दुचाकीने आपल्या गावी जात होते.

Web Title: 'Amangal' War, 21 killed; Multiple accidents on the same day across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात