समाजवादी पार्टीतील वादाला अमरसिंह जबाबदार- अबू आझमी
By admin | Published: October 25, 2016 11:06 PM2016-10-25T23:06:36+5:302016-10-25T23:06:36+5:30
समाजवादी पार्टीत महाभारत उफाळून आलं असतानाच आता अबू आझमींनीही या वादात उडी घेतली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - समाजवादी पार्टीत महाभारत उफाळून आलं असतानाच आता अबू आझमींनीही या वादात उडी घेतली आहे. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील आमदार अबू आझमी यांनी आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते अमरसिंह यांच्यावर शरसंधान केलं आहे.
यादव कुटुंबात सुरू असलेल्या वादाला अमरसिंहच जबाबदार असल्याचा आरोप अबू आझमींनी केला आहे. पक्ष फुटण्यापूर्वीच मुलायमसिंह यादव यांनी पक्षाला सावरण्याची गरज व्यक्त करत अखिलेश यादव यांची तळी उचलली आहे. अखिलेश यांच्या नेतृत्वाखालीच समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
पक्षामध्ये फूट पडण्यापासून रोखण्यासाठी मी मुलायम सिंहाना विनंती करतो. अखिलेश यादव हे पक्षाचे अत्यंत योग्य नेतृत्व करत आहेत. ते फक्त कोणाचे ऐकत नाही. मुलायमसिंह यांनी एकदा पक्षांतर्गत मतदान घेऊन अमरसिंहांबाबत मत आजमावून पाहावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
मुलायमसिंह यादव हे अनुभवी नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वातच पक्ष फोफावला. मुलायम सिंहांशिवाय समाजवादी पक्षाची कल्पनाच होऊ शकत नाही. मात्र अमरसिंह यांनी पक्षात फूट पाडण्याचे ठरवल्यानंतरही मुलायमसिंह यांनी याविरोधात ब्र काढला नाही, अशी खंत व्यक्त केली. एका व्यक्तीने नोव्हेंबर महिन्यातच ट्विट करत अखिलेश हे मुख्यमंत्री पदावर दीर्घकाळ राहणार नसल्याचे म्हटले होते. म्हणजे अनेक दिवसांपासून हा कट रचण्यात आला होता. परंतु मुलायमसिंहांना ही गोष्ट समजली नाही, असं म्हणत अमरसिंहांवर निशाणा साधला आहे.