अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा मुंबईत निषेध
By admin | Published: July 12, 2017 05:24 AM2017-07-12T05:24:49+5:302017-07-12T05:24:49+5:30
अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मंगळवारी मुंबईत ठिकठिकाणी विविध संघटनांकडून निषेध करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मंगळवारी मुंबईत ठिकठिकाणी विविध संघटनांकडून निषेध करण्यात आला. मोहम्मद अली मार्गावरील मिनारा मशिदीबाहेर रजा अकादमीने अनंतनाग येथील हल्ल्याचा निषेध करत घोषणाबाजी केली. तर हल्ल्यात मृत पावलेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईचे डबेवाले बुधवारी लोअर परळ येथील उड्डाणपुलावर जमणार आहेत.
अनंतनाग येथील हल्ल्याविरोधात मिनारा मशिदीबाहेर शेकडो मुस्लीम बांधव जमले होते. धर्माच्या नावाने हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी रजा अकादमीने केली आहे. हल्ला सुरू असतानाही मोठ्या बहादुरीने बस चालवून प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणाऱ्या बसचालक सलीमला शौर्यपदक देण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. मुंबईच्या डबेवाल्यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत केंद्र शासनाने भाविकांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी डबेवाले लोअर परळ येथील उड्डाणपुलावर जमणार आहेत. तेथे पसायनदान म्हणून डबेवाले मृतांच्या आत्म्यांना शांती लाभावी, म्हणून प्रार्थना करतील.
>हल्ल्याविरोधात आज निदर्शने
काही हिंदू आणि मुस्लीम बांधवांकडून बुधवारी अमरनाथ यात्रेवरील भ्याड हल्ल्याविरोधात आझाद मैदानात निदर्शने करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणीही या वेळी केली जाईल, असे आंदोलकांकडून स्पष्ट करण्यात आले.