अमराठी कर्मचाऱ्यांना मिळणार मराठीचे धडे
By admin | Published: April 29, 2015 01:20 AM2015-04-29T01:20:10+5:302015-04-29T01:20:10+5:30
शासकीय कार्यालयातील अमराठी कर्मचारी-अधिकाऱ्यांना मराठी भाषेची जाण व्हावी, कामकाजाला गती यावी आणि मराठी भाषिकांशी त्यांची संवादाची दालने खुली व्हावीत,
पुणे : शासकीय कार्यालयातील अमराठी कर्मचारी-अधिकाऱ्यांना मराठी भाषेची जाण व्हावी, कामकाजाला गती यावी आणि मराठी भाषिकांशी त्यांची संवादाची दालने खुली व्हावीत, यासाठी त्यांना मराठीचे धडे देण्याचा अभिनव उपक्रम राज्य मराठी विकास संस्थेने हाती घेतला आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मराठी प्रशिक्षण वर्गाचा ‘श्रीगणेशा’ होणार असून, पहिल्या टप्प्यात रेल्वे प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मराठीचे पाठ दिले जाणार आहेत. लवकरच आॅनलाईन प्रशिक्षण सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
रेल्वे भरतीमध्ये अमराठी भाषिकांच्या भरतीवरून नेहमीच ‘रणकंदन’ माजते. मराठी लोकांना भरतीदरम्यान नेहमीच डावलले जात असल्यावरून आंदोलनचा पवित्रा घेणाऱ्या ‘मनसेने’चा इतिहासही नवा नाही. आज पाहिले तर केंद्राच्या बहुतांश महत्त्वपूर्ण विभागांची मध्यवर्ती कार्यालये ही प्रामुख्याने मुंबईतच आहेत. या विभागांमध्ये बाहेरून आलेल्या कर्मचारी-अधिकारी वर्गाची संख्या सर्वाधिक आहे. मुंबई कॉस्मॉपॉलिटीन असल्याचे सांगितले जात असले तरी त्या मातीशी ‘मराठी’ची नाळ ही घट्टपणे जुळलेली आहे. सर्वच शासकीय विभागांचे कामकाज हे मराठीमध्येच होत असल्यामुळे या विभागांमध्ये काम करणाऱ्या अमराठी भाषिक कर्मचारी-अधिकारी वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे.
या प्रशिक्षण वर्गासाठीचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली होती. त्यानुसार हा अभ्यासक्रम निर्मित करण्यात आला आहे. एका शिक्षकाची नियुक्ती करून चर्चगेट येथील सभागृहात त्यांना मराठीचे पाठ देण्यात येणार आहेत. तब्बल तीन महिने हा अभ्यासक्रम राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात रेल्वे विभागातील वर्गानुसार १०० लोकांना मराठीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आठवड्यातून दोन दिवस हा वर्ग चालणार असून, ज्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष वर्गाला येणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी आॅनलाईन प्रशिक्षण देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
४केवळ इंग्रजी, हिंदीवरच प्रभुत्व असल्याने त्यांची कार्यालयीन कामकाज आणि मराठी भाषिकांशी संवादाची वीण बांधताना मोठी पंचाईत होत असल्याचे दिसून येत आहे.
४याच जाणीवेतून राज्य मराठी विकास संस्थेने अमराठी भाषिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना मराठीचे पाठ देण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती संस्थेचे मराठी विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक सोलनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.