इमॅजिकाला करमणूक करात सुट?
By admin | Published: June 12, 2015 04:08 AM2015-06-12T04:08:28+5:302015-06-12T10:13:09+5:30
खालापूर तालुक्यातील अॅडलॅब एन्टरटेंन्मेट प्रा. लि. कंपनीला (इमॅजिका) सरकारने करमणूक करात १५ टक्क्यांची सुट दिली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला
आविष्कार देसाई, अलिबाग
खालापूर तालुक्यातील अॅडलॅब एन्टरटेंन्मेट प्रा. लि. कंपनीला (इमॅजिका) सरकारने करमणूक करात १५ टक्क्यांची सुट दिली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला पुढील दहा वर्षांत सुमारे ३६० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. एकट्या रायगडमध्ये महसुलात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भुर्दंड पडणार असेल तर, महाराष्ट्रभर हाच आकडा किती असेल, याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
करमणूक कर म्हणून सरकार १५ टक्के प्रत्येक तिकिटावर आकारते. त्यानुसार ५ जून २०१३ रोजी इमॅजिकाने करमणूक करापोटी एक कोटी ५० लाख ५९ हजार रुपये जिल्हा प्रशासनाकडे भरले होते.
राज्यातील पर्यटन उद्योगाला गती देण्यासाठी पर्यटन धोरण २००६ नुसार पात्र असणाऱ्या पर्यटन उमक्रमांना करमणूक शुल्क अधिनियम १९२३ कलम ३ मधील तरतुदीप्रमाणे करमणूक करात सुट देण्याचा निर्णय सरकारने २३ आॅक्टोबर २०१२ रोजी जाहीर केला आहे.
पर्यटन धोरणाचा आधार घेत इमॅजिकाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या करमणूक कर विभागाकडे करमणूक करात सुट देण्यात यावी, असा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार १५ जून २०१३ ते १४ जून २०२३ या दहा वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीला या करातून सुट दिली आहे. त्याचप्रमाणे वॉटर पार्कसाठीही करमणूक करातून सुट मिळावी यासाठी सप्टेंबर २०१४ साली कंपनीने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यात १ जून २०१५ ते २१ मे २०२५ पर्यंत सुट मिळावी, अशी मागणी कंपनीने केली आहे. दरम्यान, सरकारच्या निर्णयानुसारच करमूणक करात सवलत दिली आहे. महसूल बुडतो ही वस्तुस्थिती असली, तरी तो सरकारचा निर्णय असल्याचे सूत्रांनी सांगितले. तिकिटाच्या किमतीतून करमणूक कर वगळला आहे का, याची तपासणी खालापूर तहसीलदारांनी करावी, असे पत्र पाठविले असल्याचे करमणूक विभागाने सांगितले.