कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर एलईडी दिव्यांनी उजळणार
By Admin | Published: November 4, 2016 05:12 AM2016-11-04T05:12:32+5:302016-11-04T05:12:32+5:30
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरास एलईडी लाईटद्वारे प्रकाशमय करण्यासाठी १ कोटी ९४ लाखांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर करण्यात आला.
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या पर्यटनवृद्धीचा एक भाग म्हणून करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरास एलईडी लाईटद्वारे प्रकाशमय करण्यासाठी १ कोटी ९४ लाखांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाची निविदा गुरुवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये मंदिराची पाचही शिखरे, प्रवेशद्वार आदींचा समावेश आहे.
कोल्हापूर शहराचे पर्यटन वाढावे, याकरीता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ५ मे २०१६ रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाचे १ कोटी ९४ लाख २५ हजारांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यातील ५० टक्के निधी जिल्हा नियोजनकडून, तर उर्वरित रक्कम देवस्थान समितीने उपलब्ध करण्याचे ठरले आहे. त्यानुसार वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामामध्ये अंबाबाई मंदिराची पाच शिखरे, चारही मुख्य प्रवेशद्वार आतून व बाहेरून, लाकडी गरुड मंडप, दोन मोठे वृक्ष, यावर एलईडी लाईटसद्वारे प्रकाश टाकला जाणार आहे. (प्रतिनिधी)