अंबाबाईचे सरकारी पुजारी उंबऱ्याबाहेरच
By admin | Published: June 24, 2017 04:13 AM2017-06-24T04:13:16+5:302017-06-24T04:13:16+5:30
करवीरनिवासिनी श्रीअंबाबाई मंदिराचे सगळे व्यवस्थापन देवस्थान समितीतर्फे केले जात असताना, समितीचे सरकारी पुजारी मात्र देवीच्या उंबऱ्याबाहेरच आहेत
इंदुमती गणेश
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्रीअंबाबाई मंदिराचे सगळे व्यवस्थापन देवस्थान समितीतर्फे केले जात असताना, समितीचे सरकारी पुजारी मात्र देवीच्या उंबऱ्याबाहेरच आहेत. या पुजाऱ्यांना देवीच्या मूर्तीजवळ जाण्याचा किंवा पूजेचा अधिकार नाही. केवळ समितीकडे पावतीने आलेले अभिषेक करून देणे आणि आलेल्या भक्तांना उंबऱ्यापासून देवीचे दर्शन घडविणे एवढ्यापुरतचे या पुजाऱ्यांचे अधिकार मर्यादित आहेत. सध्या असे चार निमसरकारी पुजारी देवीच्या सेवेत आहेत.
अंबाबाईच्या गाभाऱ्यातील हक्कदार पुजारी केवळ देवीचे धार्मिक विधी करतात आणि त्यांच्या वारात देवीला नेसविल्या जाणाऱ्या साड्या किंवा अन्य पूजेच्या साहित्याची जोडणी करतात. अलीकडे मूर्ती संवर्धनासाठी म्हणून केवळ एका पुजाऱ्याने पुढाकार घेतला होता. बाकी श्रीअंबाबाई मंदिराच्या परिसराचा, स्वच्छतेचा, व्यवस्थापनाचा, सुरक्षेचा सगळा खर्च देवस्थान समिती करते. देवीच्या नैवेद्याचा मानही एका कुटुंबाला असून, त्याचीही व्यवस्था समितीतर्फेच केली जाते. शासनाच्या वतीनेही सरकारी पुजारी नेमणे गरजेचे असल्याने, देवस्थान समितीचे अध्यक्ष अॅड अशोकराव साळोखे यांच्या काळात म्हणजे १९८० च्या दरम्यान चार सरकारी पुजारी नेमण्यात आले. हे पुजारी म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या बिंदू चौकातील श्री शाहू वैदिक स्कूलचे विद्यार्थी आहेत. त्यांना दरमहा १७ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो. आता ज्यांच्याकडे देवीच्या पूजेचा अधिकार आहे, अशी पुजाऱ्यांची ५० कुटुंबे आहेत. त्यातील मूळ पुजारी म्हणून मुनीश्वर यांना मानले जाते व नंतर वहिवाटीने ही संख्या वाढत गेली.
सध्या समितीच्या वतीने सरकारी पुजारी म्हणून योगेश व्यवहारे, मारुती भोरे, आदिनाथ सांगळे व सुदाम सांगळे हे काम करीत आहेत. त्यातील मारुती भोरे व सुदाम सांगळे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. हे काही कारणाने गाभाऱ्यात गेले, तर त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते, अशी माहिती समितीच्या पदाधिकाऱ्याने दिली.
‘गाभारा आमच्या मालकीचा,’ असे सांगत गाभाऱ्यातील पुजाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावू दिले नाहीत, ए. सी. बसवू दिला नाही. आम्ही काही करायला गेलो की, ते न्यायालयात जायचे. गाभाऱ्यातून गुटख्याच्या पुड्या, बिडीची थोटके अनेक वेळा सापडली आहेत. पावित्र्याचे भान फक्त भक्तांनीच राखायचे का...? - अॅड. गुलाबराव घोरपडे, माजी अध्यक्ष, देवस्थान समिती