नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाईच्या नित्य अलंकारांची स्वच्छता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 07:39 PM2017-09-18T19:39:17+5:302017-09-18T19:39:51+5:30
कोल्हापूर, दि. 18 : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी करवीर निवासिनी अंबाबाईच्या जडावाच्या व सोन्याच्या नित्य अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. तहानभूक हरवून ...
कोल्हापूर, दि. 18 : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी करवीर निवासिनी अंबाबाईच्या जडावाच्या व सोन्याच्या नित्य अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. तहानभूक हरवून बघत राहावे असे हे अलंकार शिलाहार, यादव, चंद्रहार , आदिलशाही,अशा विविध राजांच्या राजवटीत अंबाबाईला अर्पण करण्यात आले आहेत.
अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडपात सकाळी ११ वाजता देवस्थान समितीचे पारंपारिक दागिन्यांचे हवालदार महेश खांडेकर यांच्या उपस्थितीत दागिन्यांच्या स्वच्छतेला प्रारंभ झाला. अंबाबाईचे किरीट, कुंडल, लप्पा, चिंचपेटी, सातपदरी कंठी, चारपदरी कंठी हे जडावाचे अलंकार आहेत. तसेच सोन्यात चंद्रहार, कुंडल, मोरपक्षी, लक्ष्मीहार, चाफेकळी, ठुशी, मोहनमाळ, बोरमाळ, तणमणी, मोहराची माळ, पुतळीहार, श्रीयंत्र, मंगळसूत्र, माणकाचे झुबे, कर्णफुले, कवड्यांची माळ, हे अलंकार आहेत. या सर्व अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. यासह उत्सवमूर्तीच्याही दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये किरीट कुंडल, कोल्हापूरी साज, बोरमाळ, मोहनमाळ, मंगळसुत्र यांचा समावेश होता.
धोंडिराम कवठेकर,संकेत पवार, गजानन कवठेकर, दीपक धोंड, उदय लाड, शैलेश इंगवले, रमेश पोतदार, राजू निगडे, दिनेश सावंत यांनी दागिन्यांची स्वच्छता केली.
देवीच्या अलंकारांमध्ये कवडयाच्या दुर्मिळ माळेला मोठे महत्व आहे. याशिवाय पुतळ्याची माळ ही दरवर्षी वाढविली जाते. यात कर्नाटकातील तमन्नावर कुटूंबासह अन्य कुटूंबे यात सोन्याच्या पुतळ्या वाढवतात.
गेली दहा पिढ्यांपासून आमचे कुटूंब अंबाबाई देवीच्या खजीन्यावर हवालदार म्हणून कार्यरत आहे. सकाळपासून माझ्या देखरेखेखाली देवीच्या नित्य जडावाच्या दागिन्यांसह उत्सवमूर्तीचे दागिने पॉलिश केले.
- महेश खांडेकर, हवालदार, अंबाबाई मंदीर