आव्हाडांच्या विधानानं ठाकरे गटाची कोंडी?; अंबादास दानवेंनी भाजपालाच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 11:48 AM2024-01-04T11:48:47+5:302024-01-04T11:56:45+5:30

प्रभू श्रीराम हे या देशाचे आदर्श आहेत. त्यांच्याविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलले पाहिजे असं त्यांनी म्हटलं. 

Ambadas Danve criticized BJP on Jitendra Awhad statement on Ram | आव्हाडांच्या विधानानं ठाकरे गटाची कोंडी?; अंबादास दानवेंनी भाजपालाच सुनावले

आव्हाडांच्या विधानानं ठाकरे गटाची कोंडी?; अंबादास दानवेंनी भाजपालाच सुनावले

छत्रपती संभाजीनगर - राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या विधानानं राज्यात वाद निर्माण झाला आहे. राम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता असं आव्हाडांनी म्हटलं. आव्हाडांच्या या विधानावरून भाजपा-शिवसेना-अजित पवार गट आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी आव्हाडांच्या विधानाविरोधात आंदोलन केले जात आहे. अशातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गटाने या विधानाशी फारकत घेत आम्ही याचे समर्थन करत नाही. परंतु त्याचसोबत ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाला सुनावले आहे. 

 जितेंद्र आव्हाडांच्या विधानानं ठाकरे गटाची कोंडी झालीय का असा प्रश्न पत्रकारांनी दानवेंना विचारला. त्यावर ते म्हणाले की, आमची कोंडी होत नाही. ते जितेंद्र आव्हाडांचे विधान आहे ते त्यांच्यापाशी असेल. आम्ही या विधानाचे समर्थन करत नाही. रस्त्यावर उतरण्याची काही गरज आहे असं वाटत नाही. पण या विधानाचा निषेध करतो. प्रभू श्रीराम हे या देशाचे आदर्श आहेत. त्यांच्याविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलले पाहिजे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच हिंदुत्वाच्या गोष्टी भाजपानं करू नये. गोमांसाचे समर्थन करणारे भाजपाचे लोक आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री काय बोलले हे माहिती आहे. हे हिंदुत्व आम्हाला शिकवण्याची गरज नाही. या फालतू गोष्टी आम्हाला सांगू नका. मांसाहार खाऊन तुम्ही आंदोलन करतातच ना..आमची कसलीही अडचण नाही. घाबरण्याची गरज काय?. चर्तुर्थीच्या दिवशी मटण खाणारे आम्हाला काय शिकवणार असा टोला अंबादास दानवे यांनी भाजपा नेत्यांना लगावला आहे. 

रोहित पवारांनी दिला घरचा आहेर

आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे. देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ.. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाचा टोला लगावल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. 

Web Title: Ambadas Danve criticized BJP on Jitendra Awhad statement on Ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.