"पहिल्याची बाही दुसऱ्याला अन् खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला..."; शालेय गणवेशाच्या दर्जावरुन दानवे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:46 PM2024-09-30T12:46:51+5:302024-09-30T13:17:00+5:30

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशावरुन विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.

Ambadas Danve criticized Mahyut government over the uniforms given to school students in the state | "पहिल्याची बाही दुसऱ्याला अन् खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला..."; शालेय गणवेशाच्या दर्जावरुन दानवे संतापले

"पहिल्याची बाही दुसऱ्याला अन् खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला..."; शालेय गणवेशाच्या दर्जावरुन दानवे संतापले

Ambadas Danve on School Uniform : महायुती सरकारने सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील  विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक गणवेश अशी योजना आणली होती. शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा दर्जा आणि रंग समान असावेत म्हणून राज्यात ‘एक राज्य, एक गणवेश’ योजना सुरु करण्यात आली.  ऑगस्टपर्यंत सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप पूर्ण केले जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. विरोधकांना उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी गणवेश किती चांगले दिले जात असल्याचे सांगत सभागृहात दाखवले होते. मात्र आता याच गणवेशाच्या दर्जावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा कार्यक्रम आणि राज्य योजनेतून दोन मोफत गणवेश देण्यात येत आहेत.  ४० लाख ६० हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार होते. ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. मात्र आता अनेक ठिकाणी निम्मे सत्र संपले तरी गणवेश मिळाला नसल्याचे समोर आलं. त्यानंतर आता या गणवेशाच्या दर्जावरूनही विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. विद्यार्थ्याच्या गणवेशाच्या कपड्याचा दर्जा पाळला नसला गेल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांची चेष्टा लावल्याचेही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

"या चिमुकल्याने घातलेला गणवेश प्रतिबिंब आहे, महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे! पहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्ट ला.. काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी. विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा, तुम्ही तर त्याचीच प्रयोगशाळा करून ठेवली आहे. १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत ४५ लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ २४ लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले आहेत. ते ही हे असले बोगस! कपड्याचा धड दर्जाही पाळण्यात आलेला नाही, न शिवण धडाची! हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत. त्यातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटलेले नाहीत," अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या सगळ्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. जनता हिशोब चुकता करेल असं रोहित पवार यांनी म्हटलं. "मुख्यमंत्री साहेब आठवतंय का? मी सभागृहात गणवेशाच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्न केले असता तुम्ही माझी चेष्टा केली होती. माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण आता या गोरगरीब विद्यार्थ्यांची तरी चेष्टा करू नका. अन्यथा नियती अशी चेष्टा करेल की या गणवेशाप्रमाणे महायुतीची राजकीय अवस्था वर-खाली झाल्याशिवाय राहणार नाही. सभागृहात गणवेश दाखवताना रोहित क्वालिटी बघ असं तुम्ही म्हणाला  होतात, आता हे गणवेश बघून हीच का महायुती सरकारची क्वालिटी? हा प्रश्न पडतो. तुम्ही माझी चेष्टा करत असताना आजूबाजूला बसून दात काढणारे नेते आज गप्प का? असो गणवेश देण्याच्या नावाखाली गुजरातमधून कापड आणून दलाली खाऊन स्वतःचे खिसे भरून घेणाऱ्या सरकारचा हिशोब करण्याची वेळ आता जवळ आली आहे आणि जनता हा हिशोब चुकता करेलच," असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला.

Web Title: Ambadas Danve criticized Mahyut government over the uniforms given to school students in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.