“गद्दारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा CM व्हावे”; ठाकरे गटातील नेत्याची मन की बात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 07:51 PM2024-09-12T19:51:40+5:302024-09-12T19:52:01+5:30
Thackeray Group News: शिवसेनेला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. शिवसेना हिंदुत्ववादीच आहे, असे ठाकरे गटातील नेत्याने म्हटले आहे.
Thackeray Group News: महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुका लढणार आहेत. ही स्पष्ट भूमिका आहे. महाविकास आघाडीमध्ये आज उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व, चेहरा संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. शिवसैनिकांच्या या भावना आहेत, जनतेच्या भावना आहेत की, आगामी काळात विधानसभेसाठी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे असावेत. ज्या पद्धतीने गद्दारांनी गद्दारी करून सत्ता हिसकावली, त्यामुळे गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, ही आमची भावना आहे, असे ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
शिवसैनिकाची अपेक्षा ही समसमान नाही तर सर्वच जागा लढण्याची आहे. परंतु ही महाविकास आघाडी आहे. सर्व पक्षांना यात संधी असते शिवसेनेला संधी मिळेल. ज्या शिवसैनिकाच्या अपेक्षा आहेत. त्या पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवू, असेही दानवे यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक झाली. यावेळी बोलताना दानवे यांनी अनेक मुद्द्यांवर थेट शब्दांत भाष्य केले.
आम्ही हिंदुत्ववादी आहोत, मुस्लिम विरोधात आम्ही नाहीत
आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून मुस्लिम उमेदवार देण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. हिंदुत्व म्हणजे मुसलमान नसणे असा अर्थ नाही. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. मुस्लिम विरोधात आम्ही नाहीत. जे देशभक्त आहेत, राष्ट्रभक्त आहेत समाजासाठी काम करणारे मुस्लिम आहेत. त्यांच्या बाजूने आम्ही आहोत. त्यामुळे शिवसेनेला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. शिवसेना हिंदुत्ववादीच आहे, असे दानवे यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी याबाबत कायम भूमिका मांडलेली आहे. ते धर्मात भेद करत नाहीत. देश विरोधी वागणाऱ्या मुस्लिमांच्या विरोधात आम्ही आहोत, असे उद्धव ठाकरे नेहमी सांगतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचे निश्चित कौतुक केले पाहिजे, त्यांनी योग्य अशी भूमिका घेतली आहे. मुस्लिमांना त्यांच प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे हे योग्य आहे, असे सांगत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी समर्थन केले आहे.