अंबानी इस्पितळात १00 यकृत प्रत्यारोपणे
By admin | Published: July 7, 2015 02:10 AM2015-07-07T02:10:07+5:302015-07-07T02:10:07+5:30
कोकिलाबेन धिरुबाई अंबानी इस्पितळाच्या यकृत प्रत्यारोपण सेंटरने स्थापनेपासूनच्या अवघ्या दोन वर्षांत यकृत प्रत्यारोपणाच्या १०० यशस्वी शस्त्रक्रिया करून यशाचा मोठा पल्ला गाठला आहे.
मुंबई : येथील कोकिलाबेन धिरुबाई अंबानी इस्पितळाच्या यकृत प्रत्यारोपण सेंटरने स्थापनेपासूनच्या अवघ्या दोन वर्षांत यकृत प्रत्यारोपणाच्या १०० यशस्वी शस्त्रक्रिया करून यशाचा मोठा पल्ला गाठला आहे. या यशामुळे अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी जगातील सर्वोत्तम केंद्र अस स्थान इस्पितळाने पटकाविले आहे.
या निमित्त इस्पितळाने अलीकडेच विशेष समारंभ आयोजित केला गेला व त्यात रुग्ण आणि अवयव दात्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलताना इस्पितळाच्या अध्यक्ष टिना अंबानी यांनी प्रत्येक प्रौढ व्यक्तीने वयाचा विचार न करता हयात असताना व मृत्यूनंतरही अवयव दानाचा संकल्प करावा, असे आवाहन केले. यासाठी जागृती करून सरकारी व सेवाभावी संस्थांनी एकत्र येऊन प्रोत्साहन द्यायला हवे, यावर त्यांनी भर दिला. आपण प्रत्येक जण एखाद्याच्या जीवनात बदल घडवून आणण्याच्या क्षमतेसह जन्माला आलो आहोत व ही क्षमता वाया न जाऊ देणे केवळ आपल्याच हाती आहे, यावर त्यांनी भर दिला.
भारतात दरवर्षी सिरॉसिसमुळे यकृत निकामी झाल्याने सुमारे अडीच लाख रुग्ण मृतवत होतात, पण जेमतेम १,१०० रुग्णांवर यकृत प्रत्यारोपण करणे शक्य होते. यात दात्यांच्या अभावाखेरीज आवश्यक आरोग्य यंत्रणेचा तुटवडा हेही कारण आहे.
अंबानी इस्पितळात झालेल्या १०० पैकी १५ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मृत व्यक्तींमधून यकृत काढून घेऊन कमी केल्या गेल्या. मात्र जिवंत प्रत्यारोपणात अत्यंत जोखमीच्या शस्त्रक्रियाही यशस्वी करून इस्पितळाने नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. (प्रतिनिधी)