दीड कोटी भरल्यानंतर अॅम्बी व्हॅलीचे दारे उघडली
By admin | Published: March 2, 2016 03:46 AM2016-03-02T03:46:10+5:302016-03-02T03:46:10+5:30
मुळशी तालुक्यातील आंबवणे परिसरात १६ गावांच्या १० हजार एकर क्षेत्रावर विस्तारलेला सर्वात मोठा गृहप्रकल्प व रिसॉर्ट कंपनी म्हणून ओळख असलेल्या अॅम्बी व्हॅली कंपनीने मागील
पौड (जि. पुणे) : मुळशी तालुक्यातील आंबवणे परिसरात १६ गावांच्या १० हजार एकर क्षेत्रावर विस्तारलेला सर्वात मोठा गृहप्रकल्प व रिसॉर्ट कंपनी म्हणून ओळख असलेल्या अॅम्बी व्हॅली कंपनीने मागील तीन वर्षांचा ४ कोटी ८३ लाख रुपयांचा बिगर शेतसारा थकविल्याने मुळशी महसूल विभागाने अॅम्बी व्हॅलीला सील ठोकले. या धडक कारवाईमुळे मुळशी तालुक्यातील अशा बड्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.
मुळशीचे निवासी नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांनी सांगितले की, थकबाकी भरण्यासंदर्भात सातत्याने नोटिसा देऊनही कंपनीने तीन वर्षांतील एकूण ४ कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी भरली नाही. त्यासंदर्भात सहारा कंपनीला ५ जानेवारी २०१६ रोजी अंतरिम नोटीस देण्यात आली होती. त्यानंतरही कंपनीने भरणा केला नाही. अखेर मुळशीचे तहसीलदार प्रशांत ढगे, मंडल अधिकारी मंगेश शिंगटे, अव्वल कारकून अनिल शेडगे, माणिक साबळे, तलाठी प्रकाश वाघमारे, प्रमोद आलेकर, सुरेश चौरे, सुधीर निंबाळकर, संजय दाते यांच्या पथकाने सकाळी कंपनीच्या चारही प्रवेशद्वारांना सील ठोकले. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने तत्काळ हालचाली करून दुपारीच दीड कोटी रुपयांचा धनादेश महसूल विभागाकडे जमा केल्यावर सील काढण्यात आले. (प्रतिनिधी)
> अन्य २८ मोठे थकबाकीदार : मुळशी तालुक्यात कोका-कोला, लवासा यांसारखे अन्यही २८ मोठे थकबाकीदार असून त्यांच्याकडे जवळपास १ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यांनी दिलेल्या मुदतीत थकबाकी न भरल्यास त्यांच्यावरही अशीच कारवाई करण्यात येणार आहे. - नागेश गायकवाड, निवासी नायब तहसीलदार, मुळशी