आंबे प्रकरण : संभाजी भिडेंविरुद्ध फिर्याद दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:37 AM2018-07-25T01:37:47+5:302018-07-25T01:38:05+5:30
भिडे यांना न्यायालयाने दोषी ठरविल्यास तीन वर्षे कारावास व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकेल.
नाशिक : आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने दीडशे कुटुंबांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा केल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर तथा संभाजी भिडे यांच्यावर अखेरीस नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे मंगळवारी फिर्याद दाखल केली आहे.
भिडे यांनी असे वक्तव्य करुन गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) अधिनियम २००३ अंतर्गत कलम २२ चे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या १० जून रोजी नाशिकमध्ये शिव प्रतिष्ठानच्या मेळाव्यात बोलताना, आपल्या शेतातील आंबे १८० कुटुंबांना दिले. त्यातील दीडशे दाम्पत्यांना मुले झाल्याचा दावा भिडे यांनी केला होता. यासंदर्भात पुणे येथील आरोग्य उपसंचालकांनी कारवाई करण्याचे आदेश महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला दिले होते. या विभागांतर्गत असलेल्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यात भिडे यांच्या वक्तव्याची व्हिडीओ फीत बघून चौकशी केली असता सकृतदर्शनी भिडे दोषी आढळले होते. मात्र, भिडे यांनी यासंदर्भात नोटीस स्वीकारली नव्हती. दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी व डॉ. प्रशांत थेटे यांच्या उपस्थितीत पुन्हा समितीची बैठक झाली. त्यात ठरल्यानुसार फिर्याद देण्यात आली.
‘त्या’ मुलाखतीचीही दखल
मध्यंतरी संभाजी भिडे यांनी ‘टीव्ही १८ लोकमत’ला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी आंबे प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यावर यासंदर्भात आपल्याकडे पुरावे असून, ते न्यायालयात सादर करू, असा दावा केला होता. या मुलाखतीदरम्यानेच त्यांचे विधानदेखील न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
...तर ३ वर्षे शिक्षा
भिडे यांना न्यायालयाने दोषी ठरविल्यास तीन वर्षे कारावास व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकेल.