आंबे वक्तव्य भोवलं, भिडे गुरुजींवर कायदेशीर कारवाई होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 10:19 AM2018-07-14T10:19:29+5:302018-07-14T10:20:39+5:30
माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असं वक्तव्य संभाजी भिंडेंनी केलं होतं.
नाशिक : माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असं वक्तव्य संभाजी भिंडेंनी केलं होतं. या प्रकरणी नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत असलेल्या गर्भजल चिकित्सा व प्रसवपूर्व निदान प्रतिबंधक समितीने दोषी ठरविले आहे. पीसीपीएनडीटी या समितीने चौकशी करून संभाजी भिडेंना दोषी ठरवले आहे. पीसीपीएनडीटी कायदा अंतर्गत असलेल्या सेक्शन 22 चा भंग झाल्याचा समितीने निष्कर्ष काढला आहे. भिडे गुरुजी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आता समिती न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे भिडे गुरुजींवर कायदेशीर कारवाई होणार आहे.
समितीने अहवाल आयुक्त तुकाराम मुंढे यांना सादर केला असून, त्यांच्या संमतीनंतर प्रत्यक्षात कार्यवाही सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. समितीने भिडे यांना नोटीस पाठवून खुलासा करण्यास सांगितले होते; परंतु त्यांनी नोटीस स्वीकारली नाही आणि बाजूही मांडली नाही. त्यामुळे प्रसूतिपूर्व लिंग निदानाची जाहिरात करण्यासंदर्भात ते समितीला कलम २२(७)मध्ये दोषी आढळले आहेत. त्यानुसार आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात वडांगळीकर मठ येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी आपल्या शेतात आंब्याचे झाड असून, त्याचे आंबे १८० कुटुंबाना आपण दिले आणि त्यापैकी दीडशे जणांना मुलेच झाली, असा दावा केला होता. याबाबत पुणे येथे अतिरिक्त संचालकांकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्यांनी महापालिकेला कारवाईसाठी कळविले होते. १८ जून रोजी महापालिकेने पोस्टाने भिडे यांना सांगलीच्या पत्त्यावर नोटीस पाठविला होता. परंतु ते पत्र भिडे यांनी न स्वीकारल्याने माघारी आले होते. भिडे यांचा खुलासा प्राप्त न झाल्याने अखेरीस समितीच्या बैठकीत यावर पुढील भूमिका घेण्याचे ठरविण्यात आले होते.
संबंधित समितीने भिडे गुरुजी यांच्या वादग्रस्त विधानासंदर्भात व्हिडीओ फीत बघून खात्री करून घेतली होती. त्यानंतर त्यांना नोटीस बजावली होती. यात आंबे खाल्ल्याने दीडशे जणांना मुले झाली, ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होईल या वक्तव्यावर खुलासा करावा, तसेच त्यांनी नाशिकच्या कार्यक्रमात नमूद केलेली आंब्याची झाडे किती व कुठे आहेत? तसेच ज्या दांपत्यांना आंबे खाल्ल्याने मुले झाली अशांची नावे व पत्त्यानिशी यादी सादर करावी अशाप्रकारचा खुलासा करण्यास सांगितले होते.