‘मानवतावादी राज्यघटनेतून आंबेडकरांनी ‘राष्ट्रा’ची निर्मिती केली’
By Admin | Published: April 12, 2016 02:45 AM2016-04-12T02:45:45+5:302016-04-12T02:45:45+5:30
स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारत कधीही राष्ट्र नव्हते. त्यामुळे मोजक्या संख्येतील इंग्रजांनी सत्ता गाजवली. सत्ताधाऱ्यांमध्ये विखुरलेल्या भारताचे स्वातंत्र्यानंतर
पुणे : स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारत कधीही राष्ट्र नव्हते. त्यामुळे मोजक्या संख्येतील इंग्रजांनी सत्ता गाजवली. सत्ताधाऱ्यांमध्ये विखुरलेल्या भारताचे स्वातंत्र्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी राज्यघटनेतून खऱ्या अर्थाने एकसंघ राष्ट्र झाले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सोमवारी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्ताने महावितरणच्या पुणे परिमंडळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संस्मरणीय प्रसंगातील छायाचित्र प्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची लढाई’ या विषयावर साहित्यिक डॉ. शैलेश त्रिभुवन व कवी उद्धव कानडे यांनी डॉ. कोत्तापल्ले यांची प्रकट मुलाखत घेतली. विवेकानंद दिवाकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटी व सहवासाच्या आठवणी सांगितल्या.
धर्मावर आधारित राष्ट्रउभारणी अशक्य
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, सरंजामी व जाती व्यवस्थेमुळे माणूस म्हणून समता व न्याय यांचे अस्तित्वच नव्हते. सर्वच नागरिकांना माणूस म्हणून समान अधिकार, न्याय व बंधुत्वाने जगता यावे म्हणून बाबासाहेबांनी जात, धर्म व लिंगभेद विरहित मानवतावादी राज्यघटना तयार केली आहे. धर्मावर आधारित राष्ट्राची उभारणी शक्य नाही आणि तसे प्रयत्न झाल्यास देश पुन्हा जातीव्यवस्थेच्या गुलामगिरीत जाईल. (प्रतिनिधी)