आंबेडकरांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत !
By admin | Published: January 14, 2017 12:48 AM2017-01-14T00:48:20+5:302017-01-14T00:48:20+5:30
सुधारणांसाठी संधी; अकोला मनपाच्या सर्वच जागा लढण्याची तयारी.
अकोला, दि. १३- महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी करण्याचा भारिप-बहुजन महासंघाचा अद्याप निर्णय झाला नसून, महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या नावावर भारिप-बमसं स्वबळावर अकोला महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे, असे संकेत भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे दिले. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहर सुधारणांसाठी मतदारांना संधी उपलब्ध झाल्याचे सांगत, या निवडणुकीत सर्वच जागा लढण्याची पक्षाची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पक्षाच्या पदाधिकार्यांची बैठक घेण्यासाठी अकोल्यात आले असता, ह्यलोकमतह्णसोबत ते बोलत होते. मनपा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती-आघाडी करण्याचा निर्णय भारिप-बमसंने अद्याप घेतला नाही. त्यामुळे कोणाशीही युती व आघाडी न करता मनपाच्या सर्वच जागा स्वबळावर लढण्याची पक्षाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. अकोला शहरात मूलभूत सोयी-सुविधांच्या दृष्टीने सुधारणा झाल्या पाहिजे, असे मतदारांना वाटत असेल, तर मनपा निवडणुकीच्या माध्यमातून शहरातील मतदारांना ही संधी आली आहे. शहर विकासाच्या दृष्टीने शहरातील मतदारांनी या निवडणुकीत निर्णय घेतला पाहिजे, असे अँड. आंबेडकर यांनी सांगितले.
वॉर्डा-वॉर्डातून कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या उमेदवारांना प्राधान्य!
मनपा निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघाची उमेदवारी देताना, शहरातील वॉर्डा-वॉर्डातून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या इच्छुक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामध्ये संबंधित इच्छुक उमेदवारांच्या कार्याची पडताळणी केल्यानंतरच उमेदवारी निश्चित करण्यात येणार असल्याचे अँड.आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
उपसमिती करणार उमेदवारांची निवड !
मनपा निवडणुकीसाठी भारिप-बमसंने निवडणूक निरीक्षक उपसमिती गठित करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारुन पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची निवड या उपसमितीकडून करण्यात येणार असल्याचेही अँड.आंबेडकर यांनी सांगितले.
कार्यकर्ता जगला पाहिजे; युती-आघाडी नकोच !
पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता जगला पाहिजे, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची युती किंवा आघाडी नसावीच, असे मत अँड.आंबेडकर यांनी व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती -आघाडी न केल्यास पक्षातील कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त न्याय देणे शक्य होते, अशी आपली भूमिका असून, पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता जगणे महत्त्वाचे आहे, असेही अँड.आंबेडकरांनी सांगितले.