आंबेडकर स्मारकाची जागा राज्याकडे!
By admin | Published: March 26, 2017 03:48 AM2017-03-26T03:48:13+5:302017-03-26T03:48:13+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासाठी इंदू मिलची १२ एकर जमीन केंद्र सरकारने अखेर शनिवारी
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासाठी इंदू मिलची १२ एकर जमीन केंद्र सरकारने अखेर शनिवारी महाराष्ट्राला दिली. केंद्रीय वस्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी संबंधित कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपुर्द केली. त्यामुळे आंबडेकर स्मारकाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला.
स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पण केंद्राच्या अखत्यारीतील जमीन राज्य सरकारला दिली नाही, अशी टीका आमच्यावर होत होती. पण आज सगळ्याच टीकेला उत्तर मिळाले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या भव्यदिव्य व्यक्तिमत्त्वाला साजेसे स्मारक या ठिकाणी उभारले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते.
जमीन ताब्यात येण्यापूर्वीच या जागेवर काम सुरू करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर राज्य सरकारने काम सुरू केले आणि निविदाही काढली. जमीन मिळाल्यामुळे डॉ. आंबेडकर स्मारकाचे प्रत्यक्ष काम जोमाने सुरू होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कागदपत्रांची तयारी केवळ तीन दिवसांत केल्याबद्दल मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता आणि वस्रोद्योग महामंडळाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. स्मृती इराणी यांनीही स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)
जगात सर्वांत उंच ठरणार शिवस्मारक
अरबी समुद्रात उभारण्यात येणार असलेले शिवस्मारक हे जगातील सर्वांत उंच असावे, यासाठी त्याची उंची वाढविण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पाठविला जाईल, असे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पत्रकारांना सांगितले.
210मीटर शिवस्मारकासाठी परवानगी मागितली जाणार आहे. आधी १९२ मीटर उंचीचा प्रस्ताव होता.
208मीटर उंचीवर चीनचे स्प्रिंग टेम्पल आहे.
आठवलेंची शीघ्र कविता
नरेंद्रभाई, देवेंद्रभाई का पक्का हो गया व्हील,
क्यूं के उन्होने स्मारक
के लिए दी है इंदू मिल’
अशी शीघ्र कविता रामदास आठवले यांनी या वेळी केली. ३६०० कोटी किमतीची ही जागा स्मारकासाठी मिळाल्याने आंबेडकरी जनता आनंदी झाली आहे, असे ते म्हणाले.