‘निवडणुका आल्या की, आंबेडकरांचे स्मारक आठवते’
By Admin | Published: February 5, 2017 12:43 AM2017-02-05T00:43:18+5:302017-02-05T00:43:18+5:30
निवडणुका आल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आठवते. महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त शिवस्मारकाचे भूमिपूजन सुचते, पण प्रत्यक्षात कोणत्याच घोषणेची
आश्वी (जि.अहमदनगर) : निवडणुका आल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आठवते. महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त शिवस्मारकाचे भूमिपूजन सुचते, पण प्रत्यक्षात कोणत्याच घोषणेची अंमलबजावणी या सरकारकडून होत नाही हे दुर्दैव आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
शिर्डी विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील काँग्रेस व मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या निझर्णेश्वर येथील प्रचाराप्रसंगी ते म्हणाले, काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मोठी मदत मिळाली. दोन वर्षे दुष्काळाच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना किती मदत मिळाली? याची तुलना करा. नोटाबंदीमुळे केंद्र सरकारकडे १६ लाख कोटी रुपये जमा झाले असतील तर, तातडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील निवडणुकांच्या वेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी या सरकारने कर्जमाफीचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले.
सरकारमध्ये सहभागी असलेल्या दोन पक्षांची रोजच जुगलबंदी पाहत आहोत. दोन्ही पक्षांमध्ये तडीपार गुंड व गुन्हेगारांना खुलेआम प्रवेश देणे सुरु आहे. त्यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण कलुषित होत असून राज्य पिछेहाटीवर जात आहे, असे विखे यांनी सांगितले. (वार्ताहर)