बिहार निवडणुकीसाठी आंबेडकरांचे एमआयएमसोबत आघाडीचे संकेत
By राजेश शेगोकार | Published: September 28, 2020 04:59 PM2020-09-28T16:59:48+5:302020-09-28T17:02:40+5:30
Bihar Assembly Election 2020 : बिहार निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन पक्ष एकत्र येण्याची चिन्हे आहेत.
- राजेश शेगोकार
अकोला : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी रिंगणात उतरणार असून, बिहारचे सामाजिक गणित लक्षात घेता एमआयएमला पुन्हा सोबत घेण्याचे संकेत खुद्द अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीच दिले आहेत. आंबेडकरांनी केलेल्या आवाहनामध्ये एमआयएम मैत्रीबाबत स्पष्टता नसली तरी महाराष्ट्रत विधानसभा निवडणुकीत आम्ही सोबत येऊ शकलो नाही व परिणाम काय झाले हे समोर आहे, असे स्पष्ट केल्यामुळे बिहारमध्ये ते एमआयएमसारख्या पक्षाशी आघाडी करण्याची शक्यता व्यक्त होत आहे
सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये एमआयएमसोबत आघाडी करून ‘ओवेसी’ प्रयोग केला;मात्र औरंगाबादची एकमेव जागा वगळता कुठेही यश मिळाले नाही. खुद्द अॅड. आंबेडकर हे सुद्धा दोन ठिकाणी पराभूत झाले. संख्यात्मकदृष्ट्या या प्रयोगाला यशाची फळे मिळाली नसली तरी या दोन पक्षाच्या आघाडीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाची गणिते पूर्णत: बिघडली व वंचितचे उपद्रव मूल्य अधोरेखित झाले. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून या दोन पक्षात बिनसले अन् दोन्ही पक्षांची मैत्री तुटली. आता बिहार निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन पक्ष एकत्र येण्याची चिन्हे आहेत.
जे महाराष्ट्रात घडले नाही ते बिहारमध्ये घडवून आणू. एनडीएच्या सरकारला बिहारमध्ये पराभूत करणे हाच एकमेव उद्देश असल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे. बिहारमध्ये मुस्लीम, मागासवर्गीय आणि आदिवासी मिळून ४० टक्के समाज आहे. यांची मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न असून, त्या करिता मुस्लीम समाजाला त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून भावनिक साद घातली आहे. या सादेला कसा प्रतिसाद मिळतो, यावरच आंबेडकरांच्या बिहार निवडणुकीच्या प्रयोगाचे भवितव्य ठरणार आहे. त्यांनी यापूर्वी तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश येथेही पक्षाचे उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये तामिळनाडूमध्ये एक आमदार विजयी झाले होते, हे विशेष.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व एमआयएमच्या मैत्रीचा थांबलेला प्रवास बिहार निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत.