अंबरनाथकरही ‘प्रभू’कृपेच्या प्रतीक्षेत
By Admin | Published: April 29, 2016 04:05 AM2016-04-29T04:05:58+5:302016-04-29T04:05:58+5:30
मुंबईतील पाणीटंचाई लक्षात घेऊन ऐरोली-कळव्यादरम्यान असलेल्या दिघा धरणातून ठाणे-नवी मुंबईला पाणी देण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला.
अंबरनाथ : मुंबईतील पाणीटंचाई लक्षात घेऊन ऐरोली-कळव्यादरम्यान असलेल्या दिघा धरणातून ठाणे-नवी मुंबईला पाणी देण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला. तेच धोरण अंबरनाथच्या कोकोळे येथील जीआयपी टँकमधील पाण्यासंदर्भात घेण्याची गरज आहे. हे पाणी रेल नीरच्या माध्यमातुन विकण्यापेक्षा ते पाणी अंबरनाथकरांना वळविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या पाणी प्रश्नावर रेल्वेमंत्री ‘प्रभू’ यांची ‘कृपा’ होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मलंगगडाच्या डोंगर दऱ्यांमधून वाहणारे पाणी अडविण्यासाठी ब्रिटीशांनी रेल्वेच्या माध्यमातून १९१५ मध्ये जीआयपी टँक (धरण) बांधला. रोज चार दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्याची क्षमता या धरणाची आहे. या धरणातून पूर्वी कल्याण रेल्वे स्थानक आणि रेल्वे संकुलाला पाणी पुरवठा केला जात होता. मात्र १९९७ मध्ये हा पुरवठा बंद करण्यात आला. तेव्हापासून हे धरण वापरण्यात येत नव्हते. अखेर रेल्वे प्रशासनाने या धरणाच्या पाण्याचा वापर करुन रेल नीर हा पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प उभारला. मात्र या ठिकाणचे पाणी या प्रकल्पासाठी कमी प्रमाणात वापरण्यात येते.
या पाण्याला दुर्गंधी येत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी शुध्द झाले तरी दुर्गंधी कशी घालविणार हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी एमआयडीसीकडून पाणी घेण्यात येते. त्यामुळे या धरणाचा वापर अंबरनाथसाठी करणे शक्य आहे. हे धरण रेल्वेने पालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे दिल्यास या पाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी शहराला पुरविणे शक्य होणार आहे. अस्तित्वातील पाण्याचे स्त्रोत नागरिकांची तहान भागविण्यासाठी करणे गरजेचे आहे. त्यामुळे या धरणातील पाणी अंबरनाथला देण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी केली आहे. या संदर्भातील पत्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)