अंबरनाथच्या लॉजवर छापा, चौघांना अटक
By admin | Published: July 15, 2017 03:27 AM2017-07-15T03:27:11+5:302017-07-15T03:27:11+5:30
अंबरनाथ येथील एका लॉजवर ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने गुरुवारी रात्री छापा टाकून लॉजमालकासह चौघांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : देहविक्रीच्या व्यवसायात गुंतलेल्या अंबरनाथ येथील एका लॉजवर ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने गुरुवारी रात्री छापा टाकून लॉजमालकासह चौघांना अटक केली. या लॉजवरून एका पीडित महिलेची पोलिसांनी सुटका केली.
अंबरनाथ रेल्वे स्थानकानजीकच्या माऊली आर्केडमधील कपिला लॉजिंग अॅण्ड बोर्डिंगमध्ये देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेस मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने छापा टाकून लॉजमालक भास्कर कोटी पुजारी, व्यवस्थापक संदेश गणेश पवार, वेटर सुरेशकुमार सुंदरलाल जयस्वाल आणि दलाल शहानवाज ऊर्फ सोनू सय्यद काझी यांना अटक केली.
लॉजमध्ये आलेल्या ग्राहकांसाठी पीडित महिलेस देहविक्री करण्यासाठी आरोपी प्रवृत्त करीत असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले. त्यानुसार, आरोपींविरुद्ध अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भादंविचे कलम ३७० (२) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याचे कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित महिलेची पोलिसांनी या वेळी सुटका केली. तिची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. यापूर्वीही कारवाई होऊनही व्यवसाय सुरू असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
>यापूर्वीही झाली कारवाई
आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, त्यांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी ५४ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याच लॉजवर पोलिसांनी यापूर्वीही छापा टाकून कारवाई केली होती, हे विशेष.