अमृततुल्य
By admin | Published: April 30, 2017 02:43 AM2017-04-30T02:43:22+5:302017-04-30T02:43:22+5:30
कोणत्याही हंगामात सहज पिता येतील, अशी पेये म्हणजे पीयूष आणि लस्सी. पेयसंस्कृतीत या दोन्ही पेयांना विशेष महत्त्व आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता, ही पेये या काळात वरदान ठरतील.
- भक्ती सोमण
कोणत्याही हंगामात सहज पिता येतील, अशी पेये म्हणजे पीयूष आणि लस्सी. पेयसंस्कृतीत या दोन्ही पेयांना विशेष महत्त्व आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता, ही पेये या काळात वरदान ठरतील.
उन्हाळ्यात हैराण झालेल्या देहाला पौष्टिक प्यायला मिळाले, तर सोनेपे सुहागाच. खरे तर उन्हाळा सुसह्य होईल, अशी एकसोएक पेये या काळात मोठ्या प्रमाणात येतात. म्हणून तर या पेयांचे आपले असे वैशिष्ट्य आहे. पीयूषबाबत बोलायचे झाल्यास, कोणत्याही हंगामात पिता येणारे हे पेय आहे.
काही पेये पिऊन जिवाला समाधान मिळते, तसेच दह्यापासून तयार केलेले हे पीयूष पिताना मिळते. दही, साखर, जायफळ किंवा वेलची आणि थोडंसे पाणी. हे तर घरात अगदी सहज उपलब्ध असते. बस याच चार गोष्टी एकमेकांत मिसळायच्या, झाले पीयूष तयार. ते पिताना दह्याच्या गोडव्याबरोबर जायफळाचा गंधही रोमारोमांत भिनतो. मात्र, ती तार जमण्यासाठी पीयूष तयार करण्याचे नेमके तंत्र जमावेच लागते. ते जमले की चव बदलणार नाही, ही खात्रीच.
अशा या चविष्ट पीयूषविषयी अनेकांच्या मनात खास स्थान आहे. आजही गिरगावात गेले की, आम्ही मैत्रिणी हट्टाने पीयूष पितो. अमेरिकेत असलेल्या मैत्रिणीही आमच्यापेक्षा पीयूषचीच जास्त आठवण काढतात. विविध पेयांच्या भाऊगर्दीत आजही पीयूषविषयी वाटणारे ममत्व जरा जास्त आहे. आणि हे स्थान निर्माण करण्यात ‘प्रकाश’च्या पीयूषचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. किंबहुना, पीयूष म्हटले की, प्रकाश आणि प्रकाश म्हटले की पीयूषच डोळ्यांसमोर येते. गिरगाव आणि दादर या दोन्ही ठिकाणी असलेल्या प्रकाशच्या पीयूषच्या चवीत १९४६पासून यत्किंचितही बदल झालेला नाही. सध्या प्रकाशची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. पीयूषच्या चवीविषयी दादरच्या प्रकाश उपाहारगृहाचे मालक आशुतोष जोगळेकर म्हणाले, आमच्याकडे रोजच ताज्या दह्यापासून पीयूष तयार होते. त्यामुळे ते पिताना ताजेपणा मिळतो. गेली कित्येक वर्षं हा शिरस्ता पाळला जात असल्याचे जोगळेकर म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे पीयूष लवकर संपवावे लागते. कारण ४-५ दिवस झाले, तर त्या पीयूषला आंबूूस वास यायला सुरुवात होऊन चवच बदलते. म्हणून ताजे पीयूषच नेहमी आपलेसे वाटते.
आजकाल कोणत्याही पेयात काही ना काही टिष्ट्वस्ट करून ते पेश करण्याची पद्धत सुरू आहे. मात्र, पीयूषमध्ये असे काही बदल केल्याचे अद्याप तरी ऐकिवात नाही. त्यामुळे पीयूषचे स्थान हे विशेषच आहे, यात शंकाच नाही.
पंजाबदी लस्सी
उन्हाळ्याच्या दिवसांत गारेगार लस्सी मनाला थंडावा देते. मलईयुक्त दह्यास घुसळून त्यात साखर घालून लस्सी करतात. दही आपण नेहमीच खातो, पण लस्सी करून प्यायल्याने त्यातील पोषक तत्त्वे अधिक प्रमाणात शरीराला मिळतात. पंजाब प्रांतात तर लस्सी रोज प्यायली जाते. किंबहुना, लस्सी म्हटले की, पंजाबच डोळ्यांसमोर येतो. मातीच्या छोट्या मडक्यात ताजे घट्ट दही, साखर आणि क्रीम एकत्र करून लस्सी पिण्यात खरी मजा आहे. या गोड लस्सीचे सध्या विविध प्रकार मिळत आहेत. दह्यात पुदिना, धने-जिरे पावडर एकत्र करून मिठी लस्सी केली जाते. याशिवाय दह्यात आंब्याचा रस, पिस्ता फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर असेही प्रकार लोकप्रिय आहेत. या लस्सीला ताकाप्रमाणेच स्मोकी फ्लेवर देता येऊ शकतो. अशी स्मोकी लस्सी एकदा तरी करून बघाच!