रुग्णवाहिकेत स्फोट; बालकाचा अंत
By admin | Published: December 12, 2015 02:49 AM2015-12-12T02:49:02+5:302015-12-12T02:49:02+5:30
फक्त एक दिवसाचे वय असलेल्या नवजात बालकाला उपचारासाठी मुंबईत नेणाऱ्या रुग्णवाहिकेत सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आणि त्यातच त्याचा करुण अंत झाला.
ठाणे : फक्त एक दिवसाचे वय असलेल्या नवजात बालकाला उपचारासाठी मुंबईत नेणाऱ्या रुग्णवाहिकेत सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आणि त्यातच त्याचा करुण अंत झाला.
ही दुर्दैवी घटना येथील वर्तकनगर भागात शुक्रवारच्या मध्यरात्री १२.३० वाजता घडली. त्यात डॉक्टर भुवनदीप घरत (३०) हे २१ टक्के आणि परिचारिका रिझो सिचाको (२८) सात टक्के भाजले असून, अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. हा स्फोट इतका भीषण होता, की बाजूलाच उभी असलेली एक रुग्णवाहिका चक्काचूर झाली.
काल्हेर येथील प्लायवूडचे व्यावसायिक मनीष जैन (३२) यांची पत्नी कीर्ती (३०) यांची ९ डिसेंबर रोजी
रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास भिवंडीच्या गोपीनाथ राजन रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाली. लग्नाच्या
तीन वर्षानंतर त्यांना पहिलाच मुलगा झाला. श्वसनाचा त्रास आणि अशक्तपणामुळे बाळाला १० डिसेंबर रोजी पहाटे ठाण्याच्या वेदांत रुग्णालयात आणण्यात आले होते. तिथेही त्याच्या प्रकृतीत फारशी सुधारणा न झाल्यामुळे मुंबईतील सांताक्रुझ येथील ‘सुर्या’ या खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय जैन कुटुंबीयांनी घेतला. त्यानुसार ‘सूर्या’ची कार्डीयाक रुग्णवाहिका डॉ. घरत आणि परिचारिका रिझो यांच्यासह आली. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास डॉ. घरत यांनी बाळाला आॅक्सीजनवरच रुग्णालयातून रुग्णवाहिकेत आणले. त्यांच्यापाठोपाठ रिझोही गाडीत शिरल्या. चालक गणेश शिंदे (३२) यांनी आॅक्सीजनचा वॉल सुरू केला, त्याचवेळी काही कळण्याच्या आत रुग्णवाहिकेने पेट घेतला. तेव्हा आधी शिंदे भेदरलेल्या अवस्थेत बाहेर पडले. त्यांच्यापाठोपाठ डॉ. घरत आणि रिझोही बाहेर पडल्या. त्यानंतर एकापाठोपाठ तीन भीषण स्फोट झाले. या स्फोटानंतर रुग्णवाहिकेने पेट घेतला आणि त्यात नवजात बालकाचा करुण अंत झाला. रुग्णवाहिकेबाहेर असलेले डॉक्टर, परिचारिका, धीरज आणि विकास जैन हे किरकोळ जखमी झाले.
स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. आगीच्या प्रचंड ज्वाळा पाहून लक्ष्मण विटकर या सामाजिक कार्यकर्त्याने ठाणे अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. वागळे इस्टेट अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. मात्र, तेव्हापर्यंत एक दिवसाचे नवजात बाळ होरपळून गेले होते.
घटनास्थळी वागळे विभागाचे पोलीस उपायुक्त व्ही. बी. चंदनशिवे, सहाय्यक पोलीस आयुक्त उदय खानविलकर, वर्तकनगरचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक के.जी. गावित, श्रीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कारकर आदी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन आढावा घेतला.
याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली असली तरी बॉम्ब शोधक नाशक पथक, सिलेंडर तज्ज्ञ आणि रुग्णवाहिकेचे माहितगार यांच्याकडून माहिती घेऊन सर्व बाजूंनी तपास करण्यात येणार असल्याचे निरीक्षक गावीत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
‘वेदांत’ने हात झटकले...
या संदर्भात वेदांत रुग्णालयाशी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास संपर्क साधला असता, अपघात बाहेर घडल्यामुळे आम्हाला काहीच माहिती नाही, असा पवित्रा या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने घेतला. बाळाला नेमके कशामुळे इतरत्र हलविण्यात येत होते? त्याला या रुग्णालयात कधी दाखल करण्यात आले? याबाबत रुग्णालयाने माहिती देण्यास नकार दिला. जखमींना तातडीने प्रथम विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली.
प्रतिनिधी - जितेंद्र कालेकर