अपघातात गेलेल्या मुलाच्या स्मृतीप्रित्यार्थ आईकडून आदिवासींसाठी रूग्णवाहिका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 08:28 PM2019-01-14T20:28:44+5:302019-01-14T20:32:06+5:30
भीमाशंकर परिसरात तळेघर परिसरातील फालोदे भागात रूग्णवाहिका नसल्याने आदिवासींचे हाल होत आहेत. येथे १०८ ही शासकीय रूग्णवाहिका आहे.
श्रीकिशन काळे
पुणे : भीमाशंकर परिसरात तळेघर परिसरातील फालोदे भागात रूग्णवाहिका नसल्याने आदिवासींचे हाल होत आहेत. येथे १०८ ही शासकीय रूग्णवाहिका आहे. परंतु, त्याचा एकाच भागात उपयोग होतो. दुसरा भाग वंचित राहिल्याने कधी-कधी कोणी मयत झाले, तर दुचाकीवर त्यांना न्यावे लागायचे. ही भयानक परिस्थिती फालोदे भागातील आहे. पण आता त्यांना देखील एका स्वयंसेवी संस्थेने रूग्णवाहिका भेट दिल्याने त्यांची ही समस्या सुटली आहे. एका आईने आपल्या मुलाच्या स्मृतीप्रित्यार्थ ही रूग्णवाहिका भेट दिली आहे.
भीमाशंकर परिसरातील फालोदे गाव परिसरातील भाग अत्यंत दुर्गम असल्याने या ठिकाणी आरोग्य सेवा सर्वांना मिळणे अवघड आहे. त्यामुळे येथील आदिवासी अनेकदा आजार अंगावरच काढतात. गरोदर महिलांना देखील ऐनवेळी रूग्णवाहिका न मिळाल्याने त्यांच्या त्रासात भर पडते. वाड्या-वस्त्या दूर असल्याने आरोग्य सेवा देण्यास अडचणी येतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी रूग्णवाहिका सुध्दा उपलब्ध नव्हती. परंतु, गावकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमुळे या ठिकाणी १०८ ची रूग्णवाहिका उपलब्ध झाली.
या रूग्णवाहिकेत गेल्या तीन महिन्यांतात सुमारे ३० हून अधिक गरोदर महिलांना लाभ मिळाला आहे. तसेच इतर अपघात किंवा अचानक काही झालेल्यांना देखील ही सेवा मिळाली आहे. त्यामुळे या सेवेची अत्यंत गरज असल्याचे स्पष्ट झाले. तळेघर भागात १०८ ची रूग्णवाहिका आल्यानंतर दुसºया फालोदेच्या आजुबाजूला अनेक वाड्या, वस्त्या आहेत. त्यांना त्याचा फायदा मिळत नव्हता. त्यामुळे त्यासाठी देखील एखादी रूग्णवाहिका असली पाहिजे, यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले. परंतु, सुमारे आठ ते दहा लाख रूपये उभा करणे अवघड होते. त्यामुळे त्यांच्यासोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून आता मोठ्या पदावर काम करणाऱ्याचा ग्रुप असलेले कॉम्पिटिटिव्ह फांउडेशन सहभागी झाले, अशी माहिती फालोदे भागातील सामाजिक कार्यकर्ते अमोल वाघमोरे यांनी दिली.
रोहन ट्रस्टमुळे आदिवासींच्या चेहऱ्यावर आनंद
पुण्यातील रोहन चॅरीटेबल ट्रस्ट यांनी गावातील स्थिती पाहून रूग्णवाहिका देण्याचे ठरविले. फांउडेशनही त्यांना सहकार्य केले. रोहन ट्रस्ट ही कांता नाईक या माजी प्राचार्या यांनी स्थापन केलेली संस्था. त्यांचा मुलगा अपघातामध्येमृत्यू पावला. त्याच्या स्मृतीप्रित्यार्थ त्यांनी रोहन ट्रस्ट सुरू करून त्याद्वारे सामाजिक काम केले जाते. रूग्णवाहिका भेट कार्यक्रम फालोदे गावात रविवारी (दि.१३) झाला. या वेळी रोहन ट्रस्टच्या कांता नाईक यांनी ही रूग्णवाहिका ग्रामस्थांकडे सुपूर्द केली. या वेळी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.