108 क्रमांकाची रुग्णवाहिका बनली ‘फिरते प्रसूतिगृह’!
By admin | Published: March 23, 2017 03:12 AM2017-03-23T03:12:23+5:302017-03-23T03:12:23+5:30
आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून १0८ क्रमांकाची रुग्णवाहिका
मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून १0८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा तीन वर्षांपूर्वी सुरू केली. ही सेवा सुरू केल्यानंतर, आतापर्यंत १४ लाख जणांना या रुग्णवाहिकेची सेवा पुरवण्यात आली. विशेषत: गरोदर महिलांसाठी १0८ क्रमांकाची रुग्णवाहिका वेळावेळी मदतीला धावून आल्याचे दिसते. गेल्या तीन वर्षांत १३ हजार महिलांची प्रसूती या रुग्णवाहिकेतच झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे गरोदर महिलांसाठी ही रुग्णवाहिका ‘प्रसूतिगृह’च बनली आहे.
राज्यातील जनतेसाठी मोफत आपत्कालीन वैद्यकीय सुविधा देण्यासाठी १0८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी तीन वर्षांपूर्वी आरोग्य विभागाकडून ही सुविधा सुरू करण्यात आली. रस्ते अपघातातील जखमी, विविध हल्ल्यांत जखमी होणे, हृदयविकार असणारे, आगीत जखमी होणे, विषबाधा अशा इत्यादी रुग्णांना जवळच्याच रुग्णालयात तत्काळ उपचारासाठी पोहोचता यावे, हा उद्देश त्यामागे ठेवण्यात आला.
सध्या १0८ क्रमांकाच्या राज्यात ९३७ रुग्णवाहिका कार्यरत असून, यात ७0४ रुग्णवाहिका प्राथमिक वैद्यकीय सुविधा, तर २३३ रुग्णवाहिका या अत्याधुनिक व सुसज्ज अशा आहेत. ग्रामीण भागात १ लाख लोकसंख्येमागे १ रुग्णवाहिका, तर शहरी भागात दोन लाख लोकसंख्येमागे १ रुग्णवाहिका असे प्रमाण या रुग्णवाहिकेचे ठरवण्यात आले आहे.
१0८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यावर, अवघ्या २0 मिनिटांत ही रुग्णवाहिका मदतीसाठी उपलब्ध होते. या रुग्णवाहिकेत प्राथमिक उपचार करण्यासाठी आणि जवळच्याच रुग्णालयापर्यंत रुग्णांना नेण्यासाठी एक डॉक्टरही उपलब्ध करण्यात आला आहे. जानेवारी २0१४ ते फेब्रुवारी २0१७ पर्यंत या रुग्णवाहिकेने १४ लाख १0 हजार ७0९ जणांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, गरोदर महिलांना या रुग्णवाहिकेची चांगलीच मदत मिळाली आहे.
जवळपास १३ हजार महिलांची प्रसूती या रुग्णवाहिकेतच झाली. त्याचप्रमाणे, प्रसूती वेदना होणाऱ्या ४ लाख ३६ हजार ५१२ महिलांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या संदर्भात डी. जी. जाधव (राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियान, आपत्कालीन वैद्यकीय सेवा-प्रकल्प संचालक) यांनी सांगितले की, १0८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची मोठी मदत राज्यातील लोकांना होत आहे. खासकरून अपघातग्रस्त आणि गरोदर महिलांना याची मदत मिळत आहे. (प्रतिनिधी)