कॅन्टोन्मेंट अॅक्टमध्ये दुरुस्ती करणार
By admin | Published: June 10, 2015 01:37 AM2015-06-10T01:37:40+5:302015-06-10T01:37:40+5:30
देशभरातील कॅन्टोन्मेंट ज्या कायद्यान्वये चालविले जात आहेत़ त्यामध्ये लवकरच दुरूस्ती केली जाणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह यांनी मंगळवारी दिली.
पुणे : कॅन्टोन्मेंटच्या हात-पायांना बेडी घातल्यासारखी परिस्थती निर्माण झाली आहे. नगरसेवकांना लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये अडचणी येत आहेत. या परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी देशभरातील कॅन्टोन्मेंट ज्या कायद्यान्वये चालविले जात आहेत़ त्यामध्ये लवकरच दुरूस्ती केली जाणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह यांनी मंगळवारी दिली.
सदर्न कमांडअंतर्गत येणाऱ्या १९ कॅन्टोन्मेंटच्या नगरसेवकांसाठी पहिल्यांदाच संरक्षण मंत्रालयाकडून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राव इंद्रजित सिंह यांच्या उपस्थितीत त्याचा समारोप झाला. यावेळी आर्मी कमाडंन्ट अशोक सिंग, प्रधान निदेशक योगेश्वर शर्मा, महानिदेशक रविकांत चोपडा उपस्थित होते.
राव इंद्रजित सिंह म्हणाले, ‘‘इंग्रज देश सोडून जाताना ते कॅन्टोन्मेंट इथे सोडून गेले. आता त्यांची सेना नाही, त्यामुळे देशाच्या सैन्याचे मनोधैर्र्य कायम ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. १९६२ मध्ये चीनसोबत झालेल्या युद्धावेळी सैन्याला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. महिलांनी त्यांचे मंगळसूत्र विकून सैनिकांसाठी पैसे पाठविले. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये याकरिता सैन्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.’’
कॅन्टोन्मेंटमध्ये नगरसेवक लोकांमधून निवडून आले
आहेत. त्यामुळे लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले गेले पाहिजेत.
लोकांना सुविधा देण्यासाठी कॅन्टोन्मेंटने तत्पर असले पाहिजे. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी नगरसेवकांना भेटत नाहीत अशा तक्रारी होत्या. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये एकाच ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याची संधी नगरसेवकांना मिळाली असल्याचे राव इंद्रजित सिंह यांनी सांगितले.
देवळाली कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे, सिकंदराबाद कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष एस. केशव रेड्डी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले़ (प्रतिनिधी)