रस्ते अपघात रोखण्यासाठी अमेरिकेचा सल्ला
By admin | Published: June 6, 2017 02:15 AM2017-06-06T02:15:35+5:302017-06-06T02:15:35+5:30
देशातील रस्ते अपघातात राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. राज्यात रोज ३५ जण अपघातात मृृत्यूमुखी पडतात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील रस्ते अपघातात राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. राज्यात रोज ३५ जण अपघातात मृृत्यूमुखी पडतात. परिणामी परिवहन विभाग अपघात रोखण्यासाठी अमेरिकेतील संस्थेने सुचवलेल्या उपाययोजन राबवणार आहे. याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि अमेरिकेतील ‘वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट’ या जागतिक संस्था यांच्यात करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत ही संस्था राज्यातील अपघातांचे विश्लेषण करुन त्यावर उपाययोजना विनामुल्य सुचवण्यात येणार आहे.
वरळी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये परिवहन विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, ग्लोबल रोड सेफ्टी कार्यक्रमाचे संचालक केली लारसन, वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओ.पी.अग्रवाल हे उपस्थित होते. करारावर संस्थेतर्फे माधव पै आणि शासनातर्फे उपसचिव प्रकाश साबळे यांनी करारावर स्वाक्षरी केली.
अपघात रोखण्यासाठी केलेल्या कराराविषयी माहिती देताना दिवाकर रावते म्हणाले, रस्ते अपघातांची वाढती संख्या लक्षात घेवून सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षा समितीची स्थापना केली आहे.
या समितीने सुचवलेल्या उपाययोजनांनूसार राज्यातील अपघातांच्या कारणांचा अभ्यास करुन धोरण निश्चित करणे, सुरक्षात्मक उपाययोजनेसाठी जागतिक संस्थेची मदत घेणे हे ठरवण्यात आले होते. त्यानूसार हा करार करण्यात आला आहे. हा करार विनामुल्य असून; राज्यातील अन्य संस्थाशी समन्वय साधून ही संस्था उपाय योजना सुचवणार आहे.
परिवहन अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा
वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट या संस्थेच्या वतीने वरळी येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. परिवहन क्षेत्रातील जागतिक स्तरावरील तंत्र व अनुभवी मार्गदर्शकांसह राज्यातील परिवहन अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित राहत आहेत. सोमवारनंतर मंगळवारी ही कार्यशाळा होणार आहे.