'आमीन सायानींचा आवाज पुढील कित्येक पिढ्यांना आठवणीत राहील'; सुधीर मुनगंटीवारांनी वाहिली श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2024 03:08 PM2024-02-21T15:08:21+5:302024-02-21T15:08:27+5:30
त्यांच्या आवाजातील 'बहनो और भाईयो' आवाजाची साद आजही अनेक रसिक श्रोत्यांच्या कानामध्ये गुंजते आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी श्रद्धांजली वाहिली.
मुंबई: अनेक पिढ्यांवर आपल्या सुरेल आवाजाची मोहिनी घालणाऱ्या आणि लाखो-कोट्यवधी रसिकांना खिळवून ठेवणारे ज्येष्ठ निवेदक आणि आवाजाचे जादूगार आमीन सयानी यांचे निधन प्रत्येक रसिकांसाठी दुःखदायक आहे. त्यांचा आवाज पुढील कित्येक वर्ष रसिकांच्या कानात गुंजत राहील आणि ही मोहिनी कायम राहील." अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ज्येष्ठ निवेदक अमीन सायानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
आपल्या आवाजाची जादू चौफेर पसरवणाऱ्या या ख्यातनाम निवेदकाचे आज निधन झाले. त्याबद्दल सहसंवेदना व्यक्त करताना मंत्री मुनगंटीवार शोकसंदेशात म्हणाले की, "या महान निवेदकाचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्याचे भाग्य मला नुकतेच लाभले; त्यावेळी त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारता आल्या; ती भेट कायम माझ्या स्मरणात राहील. रेडिओ सिलोनच्या माध्यमातून 'बिनाका गीतमाला' कार्यक्रमाने एक वेगळी उंची गाठली. त्यावेळच्या गाण्यांचा त्यात जेवढा सहभाग होता, तेवढाच सहभाग अमीन भाईंच्या आवाजाचा होता.
बिनाका गीतमाला या हिंदी चित्रपटातील टॉप फिल्मी गाण्यांचा साप्ताहिक कार्यक्रमाचे लाखो श्रोते होते. बिनाका गीतमाला १९५२ ते १९८८ पर्यंत रेडिओ सिलोनवर प्रसारित करण्यात आला आणि नंतर १९८९ मध्ये ऑल इंडिया रेडिओ नेटवर्कच्या विविध भारती सेवेमध्ये स्थलांतरित झाली जिथे त्याचे प्रसारण १९९४ पर्यंत चालले होते. हा भारतीय चित्रपट गाण्यांचा पहिला रेडिओ काउंटडाउन शो होता. भारतातील सर्वात लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. हा कार्यक्रम लोकप्रिय करण्यात अमिनभाईंच्या आवाजाचा मुख्य सहभाग होता. त्यांच्या आवाजातील 'बहनो और भाईयो' आवाजाची साद आजही अनेक रसिक श्रोत्यांच्या कानामध्ये गुंजते आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी श्रद्धांजली वाहिली.