अमिन यांची पदोन्नती नऊ महिने का रखडली?
By admin | Published: May 18, 2015 04:36 AM2015-05-18T04:36:26+5:302015-05-18T04:36:26+5:30
काळबादेवीमधल्या गोकूळ हाऊस इमारतीच्या दुर्घटनेत शहीद झालेले अग्निशमन दलाचे अधिकारी सुधीर अमिन यांच्या कुटुंबीयांनी अमिन यांची पदोन्नती
मुंबई: काळबादेवीमधल्या गोकूळ हाऊस इमारतीच्या दुर्घटनेत शहीद झालेले अग्निशमन दलाचे अधिकारी सुधीर अमिन यांच्या कुटुंबीयांनी अमिन यांची पदोन्नती नऊ महिने का रखडली? असा सवाल कुटुंबीयांनी उपस्थित करत नियमांना धरून पदोन्नतीच्या द्या, असे म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून रविवारी देण्यात आलेल्या धनादेशात काही तांत्रिक चुका झाल्या. परिणामी त्यांना सुधारित धनादेश प्रदान करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
महापौर स्नेहल आंबेकर आणि सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी दिवंगत सुधीर अमिन यांच्या रविवारी कुटुंबीयांनी चेंबूर येथील अग्निशमन दल वसाहतीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शिवाय कुटुंबीयांचे सांत्वन करत मदतही देऊ केली. यावेळी अमिन यांची उपप्रमुख अग्निशमन अधिकारी या पदावरील पदोन्नती ९ महिने का रखडवली? असा सवाल त्यांच्या पत्नी शर्मिला अमिन यांनी उपस्थित केला. कुटुंबाला मिळणारी नुकसानभरपाई पदोन्नतीच्या नियमांना धरुन का दिली जात नाही? असेही त्या म्हणाल्या. शिवाय अमिन यांना शहीद म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यानच्या काळात अमिन कुटुंबीयांनी पालिकेकडून प्रदान करण्यात आलेला धनादेश स्वीकारला नसल्याच्या वृत्ताने पालिकेचे धाबे दणाणले. मात्र त्यानंतर काही वेळातच प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. कुटुंबीयांना देण्यात आलेल्या धनादेशात काही तांत्रिक चुका होत्या. कोणतीही अडचण होऊ नये म्हणून सुधारित धनादेश प्रदान करण्यात येणार आहे. शिवाय कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबतही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले
आहे. (प्रतिनिधी)