आमीर करणार ‘जलयुक्त’चा प्रचार
By admin | Published: February 18, 2016 07:08 AM2016-02-18T07:08:55+5:302016-02-18T07:08:55+5:30
महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी आता अभिनेता आमिर खानही योगदान देणार आहे. तो आणि त्याची पत्नी ‘पानी फाऊंडेशन’च्या माध्यमातून या योजनेचा प्रचार, प्रसार, प्रशिक्षण आयोजन करण्यात येणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी आता अभिनेता आमिर खानही योगदान देणार आहे. तो आणि त्याची पत्नी किरण राव यांच्या ‘पानी फाऊंडेशन’च्या माध्यमातून या योजनेचा प्रचार, प्रसार, प्रशिक्षण आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि आमिर यांनी संयुक्त पत्र परिषदेत ही माहिती दिली.
जलयुक्त शिवार योजनेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावांना आमिर यांच्या फाऊंडेशनच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप प्रदान करण्यात येतील. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका, बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुका आणि अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यांतील गावांची स्पर्धा पहिल्या टप्प्यात प्रायोगिक स्तरावर घेण्यात येणार आहे. त्यसाठी पहिले बक्षीस ५० लाख, द्वितीय ३० लाख तर तृतीय बक्षीस २० लाखांचे असेल. ३०० गावांत ही स्पर्धा होईल. प्रत्येक गावात ग्रामसभेने निवडलेल्या पाच जणांची निवड प्रशिक्षणासाठी होईल. (विशेष प्रतिनिधी)
जलयुक्त शिवार योजना ही लोकचळवळ व्हावी यासाठी टीव्ही, रेडिओ आणि सर्व प्रकारच्या सोशल नेटवर्कच्या माध्यमातून व्यापक जागृती केली जाईल. या योजनेच्या यशोगाथा दाखविल्या जातील. - आमीर खान आमिर यांनी मध्यंतरी घेतलेल्या भूमिकेवर आता ‘जलयुक्त’मधील त्यांच्या सहभागानिमित्ताने पडदा टाकण्यात आला आहे का, असे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, काही विषय वादांच्या पलिकडचे असतात व काही बातम्या या सकारात्मकदेखील असाव्यात. आमिर खान यांना ब्रँड अॅम्बेसिडर करण्याची गरज नाही. आमच्याकडे पोपटराव पवार, डॉ. अविनाश पोळ यांच्यासारखे ब्रँड अॅम्बेसिडर आधीपासूनच आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी तो विषय टोलविला.आमिर खान यांना जलयुक्त शिवार योजनेचे ब्रँड अॅम्बेसिडर करण्याचे आधी ठरले होते. मात्र, आमिर यांनी मध्यंतरी असहिष्णुतेच्या मुद्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे तसे करण्याचे टाळण्यात आले, अशी चर्चा आहे.