सातारी त्यागापुढे फिल्मी ‘आमिरी’ फिकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2015 11:55 PM2015-11-24T23:55:01+5:302015-11-25T00:37:32+5:30
देश सोडून जाण्याची भाषा : खान पती-पत्नीवर सोशलमीडिया चवताळली, स्वाती महाडिकांच्या देशप्रेमाचा दिला गेला दाखला
सातारा : सुप्रसिध्द अभिनेता आमिर खानच्या पत्नीने देश सोडण्याची भाषा केल्याचे प्रसारमाध्यमातून झळकताच सोशलमीडियावर प्रचंड गदारोळ निर्माण झाला. खान पती-पत्नीवर टीकाटिप्पणी सुरू झाली. मात्र, देशप्रेमाची उदाहरणे देताना साताऱ्याचे शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नीने मुलांना लष्करात पाठविण्याचा निर्णय सोशलमीडियावर व्हायरल झाला. पोगरवाडीतील देशसेवेच्या श्रीमंतीपुढे चित्रतारकांची ‘आमिरी’ फिकी पडल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले.
आमिर खानच्या पत्नीने केलेले वक्तव्य आणि वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी केलेली घोषणा यांची तुलना करत आज दिवसभर सोशल मीडियावर रान पेटले. कोणी याचे समर्थन केले तर कोणी बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आमिरवर शाब्दिक आसूड ओढला. दिवसभर अनेक ग्रुपवर आणि वैयक्तिकही अनेकांनी यावर मतांतरे नोंदविली.
विशेष म्हणजे, एकीकडे आमिर खान व त्याची पत्नी किरण राव यांचे फोटो तर दुसरीकडे वीरपत्नी स्वाती महाडिक व त्यांची दोन मुले यांचा फोटो जोडून वेगवेगळ्या पोस्टही सोशलमीडियावर प्रचंड प्रमाणात फॉरवर्ड झाल्या.
देशात असहिष्णुतेचे वातावरण असल्यामुळे देश सोडून जाण्याची भाषा करणारी अभिनेता आमिर खानची पत्नी किरण राव एकीकडे तर, सीमेवर दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलेल्या पतीच्या पश्चात आपली दोन्ही मुलं फौजेत पाठविण्याची धाडसी इच्छा व्यक्त करणाऱ्या स्वाती महाडिक दुसरीकडे! एकीला काळजी आहे आपल्या मुलाची तर दुसरीला जाण आहे मातृभूमीच्या रक्षणाची! याचीही चर्चा फेसबुक, टिष्ट्वटर अन् व्हॉटस्अॅपवर दिवसभर रंगली.
विशेष म्हणजे, सार्वजनिक ग्रुपवर सहसा व्यक्त न होणारी मंडळीही मंगळवारी तावातावाने आपल्या प्रतिक्रिया मांडताना सातारकरांना पाहावयास मिळाली. (प्रतिनिधी)
आमिरच्या विरोधातली पोस्ट...
आमिर....तुला सरफरोशमधला तो खेडा नाकावाला सीन आठवतो? इन्स्पेक्टर सलीमचा तू पाणउतारा केलेला असतोस. मेरा घर (देश) बचाने के लिए, मुझे किसी सलीम की जरूरत नहीं, असं बोलतोस. तरीही, तो तुला म्हणजे एसीपी राठोडला खेडा नाक्यावर येणाऱ्या गुन्हेगारांची टीप देतो. तू त्यांना पकडतोस. सलीम जायला लागतो. तू त्याला अडवतोस. त्याची माफी मागतोस. तेव्हा सलीम म्हणतो....दस नहीं दस हजार
सलीम मिलेंगे मगर फिर कभी किसी सलीम से ये मत कहना के ये मुल्क उसका
घर नहीं है.
किरण... तुझी बायको कदाचित म्हणून गेलीही असेल, पण तुला काय वाटलं-वाटतं? देश सोडून जाण्याची वेळ येणं, हे काय असतं ते मध्य आशियातल्या देशांतल्या नागरिकांना विचार. तुझे कॉन्टॅक्ट्स असतीलच म्हणा.. तुझ्या एका वाक्यानं तू या आपल्या भारताला थेट सीरिया, अफगाणिस्तानच्या रांगेत आणून बसवलंस? विसरलास तो इन्क्रिडिबल इंडिया? परदेशी पर्यटकांना न फसवणारे स्थानिक..... परदेशी महिलेला वाचवणारा सरदारजी... आमिर.. याला म्हणतात सुख बोचणं!
आमिरच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया
किरण आणि आम्ही सबंध आयुष्यभर भारतात राहिलो, राहत आहोत; परंतु प्रथमच किरण मला म्हणाली, आपण भारत सोडून जाऊ या का? आणि हे खूप धक्कादायक आणि प्रचंड भयानक विधान आहे (याचा अर्थ मी देश सोडून जातो असे आमीर म्हणाला असा होत असेल तर आपल्या आकलन कौशल्याला सलाम ! साष्टांग नमस्कार ! ) तिला तिच्या मुलाची चिंता वाटते. तिला आजूबाजूच्या वातावरणाची भीती वाटते. दररोजचं वर्तमानपत्र उघडताना तिच्या मनात धास्ती असते. आजूबाजूला किती भीतीदायक, अशांततेचं वातावरण आहे, याचं हे निदर्शक आहे! किरणच्या मनात असा विचार येणंसुध्दा किती धक्कादायक आहे, असं आमिर म्हणतोय आणि मी देश सोडून जाणार, असं आमिर म्हणाला, अशी आवई ठोकली आहे. वाह रे वा भक्त लोक.
माझे पती कर्नल संतोष देशासाठी लढत असताना शहीद झाले. त्यांचाच आदर्श घेऊन माझ्या दोन्ही मुलांनाही मी लष्करात दाखल करणार आहे. नियमात बसल्यास मीही सैन्यात जाण्यासाठी तयार आहे.
माझी पत्नी किरण घरी बोलताना म्हणते की, देशातल्या सध्याच्या वातावरणामुळे आपल्या मुलांबद्दल भीती वाटते. अशांतता, निराशेचे वातावरण वाढत आहे. आपण भारताबाहेर जायचे काय?