लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार?
By शेखर पानसरे | Published: November 17, 2024 12:09 PM2024-11-17T12:09:36+5:302024-11-17T12:10:24+5:30
आमदार लहामटे यांना महायुतीची उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाजपचे वैभव पिचड हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत.
शेखर पानसरे, अकोले
Maharashtra Elections 2024: कम्युनिस्ट विचारसरणीचा बालेकिल्ला असलेल्या अकोले विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे डॉ. किरण लहामटे, शरद पवार गटाचे अमित भांगरे व अपक्ष वैभव पिचड असा तिरंगी सामना होत आहे. महायुती व महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. निवडणुकीत चुरस असून, मत विभागणीमुळे कुणाचे पारडे जड होणार ? याकडे लक्ष लागले आहे.
माजी आमदार वैभव पिचड यांनी गतवेळी भाजपत प्रवेश करून निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादीचे डॉ. किरण लहामटे यांनी पिचड यांना पराभूत केले होते. पिचड घराण्याची ४० वर्षांची सत्ता पायउतार झाली. पूर्वी काँग्रेस विरुद्ध कम्युनिस्ट-समाजवादी, अशी लढत व्हायची. या मतदारसंघात तिरंगी लढतीचा माजी मंत्री मधुकर पिचड यांना सतत फायदा होत गेला.
आमदार लहामटे यांना महायुतीची उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाजपचे वैभव पिचड हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. आघाडीने अमित भांगरे यांना उमेदवारी देताच उद्धव ठाकरे गटाचे मधुकर तळपाडे व मारुती मेंगाळ यांनी बंडखोरी केली आहे.
मतदारसंघातील कळीचे मुद्दे
आमदार लहामटे यांनी विकास कामासाठी अडीच हजार कोटींचा निधी आणला. विकास कामे केली, असा लहामटे समर्थकांकडून प्रचार केला जात आहे.
विकास कामांविरुद्ध विरोधक आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांच्याशी गद्दारी, असे मुद्दे उपस्थित करत विरोधकांनी रान उठवले आहे. व्यक्तिगत टीकाटिप्पणीपर्यंत प्रचार पोहचला आहे.
माजी मंत्री मधुकर पिचड हे रुग्णालयात उपचार घेत असल्याने प्रत्यक्ष प्रचारात नाहीत. पण, त्यांनी केलेली ४० वर्षांची कामे यातून सहानुभूतीपूर्वक मांडली जात आहेत.
विकास, सहानुभूती, कोणी किती त्याग केला, या भोवती प्रचार घोंगावत असला, तरी मत विभाजन हा फॅक्टर नेमका कोणाच्या तोट्याचा हे मतदानातून निश्चित होणार आहे.