अमित शहांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
By admin | Published: June 18, 2017 10:51 AM2017-06-18T10:51:23+5:302017-06-18T12:50:44+5:30
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे सुद्धा उपस्थित होते. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. या सर्चेचा सविस्तर तपशील अद्याप आलेला नसला तरी सरसंघचालक मोहन भागवत किंवा डॉ. स्वामिनाथन यांना रालोआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी शहांकडे केल्याचे समजते.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आज सकाळीच मातोश्रीवर दाखल झाले होते. अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे हेसुद्धा मातोश्रीवर आले होते. ठाकरे आणि शहा यांच्यात होणाऱ्या भेटीदरम्यान राष्ट्रपती निवडणूक तसेच इतर विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवल्याचे वृत्त आहे. तसेच भागवतांच्या नावाला पर्याय म्हणून डॉ. स्वामिनाथन यांचे नाव सुचवण्यात आले आहे. दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेत सहभागी करून घेण्यात आले नाही.
काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित शहा म्हणाले "सर्वच मतदारसंघांमध्ये आपली ताकद वाढवा, असे मी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि इतरांनाही सांगितले होते." देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र तीन दिवसांपूर्वीच ते मध्यावधीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले होते. याकडे लक्ष वेधले असता शहा म्हणाले की, "मध्यावधी निवडणूक होणार, असे मुख्यमंत्र्यांनी कुठेही म्हटलेले नव्हते. उद्या मध्यावधी झालीच तर आम्ही लढू आणि जिंकूच. पळून थोडीच जाणार! असे त्यांनी सांगितले.
Mumbai: BJP President Amit Shah arrives at "Matoshree", to meet Uddhav Thackeray shortly over presidential elections pic.twitter.com/cKidNYjHKk
— ANI (@ANI_news) June 18, 2017