अमित शहा, मुख्यमंत्र्यांचा आज सोलापुरात रोड शो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 02:27 PM2019-09-01T14:27:15+5:302019-09-01T14:34:10+5:30
महाजनादेश यात्रेचा समारोप; पार्क स्टेडियमवर सायंकाळी सात वाजता होणार जाहीर सभा
सोलापूर : भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज रविवारी सायंकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. जुना पुणे नाका ते पार्क चौक या मार्गावर अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो होणार आहे. यानंतर पार्क स्टेडियमवर जाहीर सभा होणार आहे. या सभेतून विधानसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत संकेत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा आयोजित केली होती. २३ जिल्ह्यांचा प्रवास संपवून ही यात्रा रविवारी सोलापुरात पोहोचत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला महाजनादेश यात्रेचा रथ जुना तुळजापूर नाका येथे दाखल होईल. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी स्वागत करतील. सायंकाळी ६.३० वाजता हा रथ जुना पुणे नाका येथे दाखल होईल. या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचतील. अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो शिवाजी चौकमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दाखल होईल. सायंकाळी सात वाजता पार्क स्टेडियमवर अमित शहा यांची जाहीर सभा होईल.
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजप आणि शिवसेनेत इनकमिंग वाढले आहे. दोन्ही पक्षात इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती होणार का? याबद्दल उलट-सुलट चर्चा होत आहे. रविवारी होणाºया जाहीर सभेतून युतीच्या जागा वाटपाबाबत संकेत मिळण्याची चिन्हे आहेत. भाजपसोबत शिवसेनेच्या नेत्यांचे या यात्रेकडे लक्ष लागले आहे.
मेगा भरतीची शक्यता
महाजनादेश यात्रेसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे अनेक मंत्री, पदाधिकारी रविवारी सायंकाळी सोलापुरात येत आहेत. जनादेश यात्रेच्या मंचावर अमित शहा, देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह ३० जणांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी काही नेत्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे.