शाह-शिंदेंची भेट अन् शिवसेना भाजपात विलीन करण्याचा सल्ला?; आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा
By प्रविण मरगळे | Updated: March 2, 2025 11:11 IST2025-03-02T11:10:12+5:302025-03-02T11:11:02+5:30
शाह यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी नाराजीचा सूर शाह यांच्या भेटीत होता असं राऊतांनी सांगितले.

शाह-शिंदेंची भेट अन् शिवसेना भाजपात विलीन करण्याचा सल्ला?; आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्याबाबत अनेक दावे करण्यात येत आहेत. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं दबक्या आवाजात बोललं जाते. त्यातच आता खासदार संजय राऊत यांनी सगळ्यात मोठा दावा केला आहे. सामनाच्या रोखठोक सदरातून राऊतांनी अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची २२ फेब्रुवारीला पहाटे भेट झाल्याचं सांगत या भेटीतील संवादावर भाष्य केले आहे.
संजय राऊत यांनी लिहिलंय की, एकनाथ शिंदे शनिवारी २२ फेब्रुवारीला पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील वेस्टइन हॉटेलात ही भेट झाली. सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही. कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत हे सांगण्यासाठी शिंदे पहाटे ४ वाजता शाहांना भेटले. शाह यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी नाराजीचा सूर शाह यांच्या भेटीत होता असं त्यांनी सांगितले.
तसेच या भेटीत एकनाथ शिंदे यांनी माझी आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे उघडपणे प्रयत्न सुरू आहेत अशी तक्रार केली. त्यावर मी देवेंद्रशी बोलतो असं शाह म्हणाले, त्यानंतर मी तुमच्या भरवशावर भाजपासोबत आलो, निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री करणार असं तुम्ही वचन दिले होते असं शिंदेंनी सांगितले. त्यावर आमचे १२५ लोक निवडून आलेत, मग तुम्ही दावा कसा करू शकता असा सवाल शाह यांनी शिंदेंना विचारला. त्यावर माझ्या नेतृत्वात निवडणूक झाली होती असं शिंदे म्हणताच शाह बोलले, नाही, मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होती असं उत्तर एकनाथ शिंदेना दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.
"भाजपात मर्ज व्हा मग मुख्यमंत्रिपदावर दावा करा"
या भेटीत अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावर दावा करायचा असेल तर भाजपात विलीन व्हा असा सल्ला दिला. आम्ही तुमचा आदर करतो, परंतु यापुढे मुख्यमंत्री भाजपाचा असेल असं शाहांनी सांगितले. त्यावर आमच्या पक्षाचं काय असा सवाल शिंदेंनी शाह यांना केला. त्यावर ते आमच्यावर सोडा, तो पक्ष आम्हीच बनवलाय, तुम्ही चिंता करू नका असं शाह यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले. त्यानंतर या दोन नेत्यांची बैठक संपली हे भाजपाच्या लोकांनीच सांगितले असा दावा संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून केला आहे.
दरम्यान, आज दिल्लीपुढे महाराष्ट्र पहाटे ४ वाजेपर्यंत ताटकळत उभा राहतो, झुकतो याचे पाणी दिल्लीने जोखले. व्यक्तिगत स्वार्थ, सत्तेची चटक यामुळे झपाटलेले कार्यकर्ते, नेते सत्तेशिवाय जणू देशसेवाच शक्य नाही अशा तिरीमिरीत सगळेच सैरावैरा धावत सुटलेत. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाहांनी फोडली, ती शिंदेंच्या हातावर ठेवली. आज शिंदेंना मुख्यमंत्री पुन्हा व्हायचे म्हणून ती चोरलेली शिवसेना भाजपामध्ये विलीन करायला निघालेत अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला.