शिवसेना-भाजपा युती तुटण्याला ती एकच व्यक्ती जबाबदार?; संजय राऊतांनी थेट नाव घेतलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:17 IST2025-01-30T11:09:52+5:302025-01-30T11:17:53+5:30
मी याक्षणी युतीबाबत उत्तर देऊ शकत नाही. पुढच्या घडामोडी काय घडणार आहेत याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्याने आम्ही सध्या Wait and Watch या भूमिकेत आहोत असं राऊतांनी म्हटलं.

शिवसेना-भाजपा युती तुटण्याला ती एकच व्यक्ती जबाबदार?; संजय राऊतांनी थेट नाव घेतलं
मुंबई - चंद्रकांत पाटील हे आमचे सगळ्यांचे मित्र आहेत. ते शिवसेना-भाजपा युतीचे समर्थक राहिलेत. जी जुनी पिढी एकत्र होती त्यात चंद्रकांत पाटलांसारखे नेते होते. कदाचित भाजपात जे हौसे नवसे आणि गवसेआलेत त्यांना २५ वर्षातील आमच्या युतीचं महत्त्व कळणार नाही. आता जे आहेत त्यांचा ना भाजपाशी संबंध ना हिंदुत्वाशी संबंध..चंद्रकांत पाटील यांच्या भावना या त्यांच्या पक्षात अनेकांच्या आहेत. आम्ही एकत्र २५ वर्ष उत्तम पद्धतीने काम केले. नरेंद्र मोदी यांच्यासोबतही आम्ही चांगले काम केले पण दिल्लीत अमित शाह यांचा उदय झाल्यानंतर शिवसेना-भाजपात वितुष्ट आलं असं सांगत खासदार संजय राऊत यांनी शिवसेना-भाजपा युती तुटण्याला शाह यांनाच जबाबदार धरलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. त्यांच्यासारख्या भावना आमच्या पक्षातील नेत्यांमध्येही असू शकतात. आम्ही महाविकास आघाडीत गेलो त्याला कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीतील काही लोकांचा हट्ट आहे. २५ वर्षाची आमची युती ज्या कारणांसाठी तुटली ती कारणे पाहिली तर आमची भूमिका योग्य होती. जे आम्ही मागत होतो, जो आमचा हक्क होता तो तुम्ही आमचा पक्ष फोडून एकनाथ शिंदेना दिला. आमचा पक्ष फोडून मुख्यमंत्रिपदाचा दावा आणि हक्क तुम्ही एकनाथ शिंदेंना दिला असं त्यांनी सांगितले.
तसेच जेव्हा आम्ही मागणी केली होती, तेव्हा अमित शाहांनी ती मागणी नाकारली. अमित शाह यांनी ठरवून बाळासाहेबांची शिवसेना फोडायची होती. त्यांचे आर्थिक हितसंबंध या मुंबईत गुंतले होते. आजही एकनाथ शिंदेंचा वापर ते त्यासाठीच करतायेत असा आरोप राऊतांनी केला.
एकनाथ शिंदेंचा गट फुटणार?
दरम्यान, मी याक्षणी युतीबाबत उत्तर देऊ शकत नाही. पुढच्या घडामोडी काय घडणार आहेत याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्याने आम्ही सध्या Wait and Watch या भूमिकेत आहोत. एकनाथ शिंदे यांचा गट भाजपासोबत किती काळ राहील आणि किती वेळ टिकवला जाईल याबाबत माझ्या मनात साशंकता आहे. एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेप्रमाणे फोडला जाईल. त्यांचा गट विस्कळीत होईल. आज केवळ सत्ता आणि पैसा या जोरावर ते एकत्र आहेत बाकी त्यांच्याकडे काही नाही असंही संजय राऊतांनी दावा केला आहे.