शिवसेनेच्या जागांवरही अमित शहांची नजर
By admin | Published: May 24, 2015 01:54 AM2015-05-24T01:54:44+5:302015-05-24T01:54:44+5:30
राज्यात विधानसभा निवडणुकीत जिथे भाजपाचा उमेदवार पराभूत झाला, त्या प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी सत्तेतील मंत्री व अन्य नेते घेतील.
कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीत जिथे भाजपाचा उमेदवार पराभूत झाला, त्या प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी सत्तेतील मंत्री व अन्य नेते घेतील. त्यांना पाच वर्षे मदत करून हे मतदारसंघ पुढील निवडणुकीत आपले कसे होतील, असे प्रयत्न करावेत. भाजपा मजबूत बनला तर महाराष्ट्र देशातील एक नंबरचे राज्य बनू शकेल, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केले.
येथे सुरू असलेल्या राज्य कार्यकारिणीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या जागांवरही शहा यांची नजर असल्याची चर्चा तिथेच सुरू झाली. सत्तेत असूनही भाजपा आणि शिवसेना या पक्षांतील अंतर्गत धुसफूस व मुख्यमंत्र्यांनी सरकार कोसळणार नाही, असे वक्तव्य केल्याने या चर्चेला बळ आले.
हातात भाजपाचा झेंडा, मनात संकल्प आणि एक वर्षातील दोन्ही सरकारचे काम घेऊन कार्यकर्त्यांनी घराघरांत जावे. भाजपा जे काम करत आहे, ते देशाचा गौरव करणारे असल्याचे तुम्ही जनतेला सांगा. जिथे आपला पराभव झाला असा एकही मतदारसंघ सोडू नका. गाव अन् गाव पिंजून काढा आणि पक्ष मजबूत करा, असे आवाहन शहा यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक वर्षातील कार्यकाळाबद्दल मीडियावाले व काही विरोधी पक्ष लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत; परंतु १२ लाख कोटींचे घोटाळे करणाऱ्या सरकारला घालवून जनतेने निवडून दिलेल्या सरकारने पहिल्या वर्षात भ्रष्टाचारमुक्त कारभार केला, ही आमच्या सरकारची उपलब्धी नाही का, असा सवालही त्यांनी केला. त्यांनी काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली. पक्षकार्यकर्त्यांची मान शरमेने खाली जाईल, असे एकही काम आम्ही केलेले नाही. आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याचे धाडस विरोधकांनाही झालेले नाही. ‘आज जो-तो उठतो आणि काळ्या पैशांचे काय झाले’, अशी विचारणा आम्हाला करतो. यूपीए सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एसआयटी नेमण्याचे आदेश देऊनही त्यांनी त्याकडे तीन वर्षे दुर्लक्ष केले. आम्ही सत्तेवर येताच मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत काळा पैसा आणण्यासाठी ‘एसआयटी’ची नेमणूक केली. त्याशिवाय काळ्या पैशाबद्दल दहा वर्षांची शिक्षा देणारा कायदाही आम्ही करीत आहोत. त्याचा मसुदा राष्ट्रपतींकडे सहीसाठी प्रलंबित आहे. ज्यांनी साठ वर्षांत काळ्या पैशाबद्दल काहीच केले नाही ते आमच्याकडे एका वर्षाचा हिशेब मागत आहेत, अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली. मनमोहन सिंग यांच्या काळात पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती. ती मोदी यांनी पुन्हा प्रस्थापित केली. मनमोहन सिंगदेखील परदेश दौरे करीतच होते; परंतु ते कुणाला माहीतच होत नव्हते. आता मोदी यांचा डंका जगभर वाजत आहे. हा एकट्या त्यांचा नव्हे तर सव्वाशे कोटी जनतेचा सन्मान आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
मंगळवारपासून ‘जनकल्याण पर्व’
केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती गावोगावी व घरोघरी जावी यासाठी मंगळवारपासून ते एक जूनपर्यंत ‘जनकल्याण पर्व’ साजरे करण्यात येणार आहे.