Amit Shah Maharashtra Visit: अमित शाहांच्या दौऱ्यामुळे पक्षात चैतन्य, महायुतीच्या विजयासाठी भाजपा सज्ज- चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 03:59 PM2024-09-26T15:59:42+5:302024-09-26T16:02:05+5:30
Amit Shah Maharashtra Visit, BJP: मविआने केलेल्या खोट्या प्रचाराचा भाजपाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन भांडाफोड करतील, असेही ते म्हणाले.
Amit Shah Maharashtra Visit, BJP: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौर्यात पदाधिकार्यांना, कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे संघटनेत ऊर्जा निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी पक्ष संघटना जोमाने काम करेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन सामान्य जनतेच्या मनात महाविकास आघाडीने खोट्या प्रचारामुळे निर्माण केलेला संभ्रम दूर करतील, त्याचबरोबर केंद्र, राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती देतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
"महाविकास आघाडीच्या खोट्या नरेटीव्हमुळे काही समाजांमध्ये आपापसात वाद निर्माण झाले."
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 26, 2024
- भाजप प्रदेशाध्यक्ष @cbawankule जी#Maharashtra#BJPMaharashtra#ShameOnMVApic.twitter.com/8VhIhs44FA
बावनकुळे म्हणाले, "केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २४, २५ सप्टेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात संघटनात्मक बैठका घेतल्या. या दौर्यामध्ये जवळपास 5 हजार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी श्री. शाह यांनी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय असावा, महायुतीचा विजय व्हावा यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कसे काम करावे याविषयी अमित शाह यांनी मार्गदर्शन केले."
"बूथ पातळीवरच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मनात केंद्र आणि राज्य सरकार विषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याची सूचना श्री. शाह यांनी केली आहे. त्यादृष्टीने पक्ष कार्यकर्ते बूथपातळीवर सक्रीय होतील,पक्ष कार्यकर्त्यांनी बूथपातळीपर्यंत सामान्य जनतेशी संपर्क साधावा तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, सरकारची चांगली कामगिरी आणि संघटनेची ताकद याच्या जोरावर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणणे, यासाठी अमित शाह यांनी या संघटनात्मक बैठकांमध्ये कार्यकर्ते, पदाधिकार्यांना विजयाचा मंत्र दिला", असे बावनकुळे यांनी सांगितले.
अमित शाह यांनी प्रमुख पदाधिकार्यांना केलेल्या मागदर्शनामुळे संघटनेत उर्जा निर्माण झाली आहे. अमित शाह यांनी संघटन शक्ती मजबूत करण्याच्या आणि डबल इंजिन सरकारची कामगिरी सामान्य माणसांपर्यंत पोहचवण्याचा दिलेल्या मूलमंत्राचे आम्ही पालन करू आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू, असेही बावनकुळे म्हणाले.