अमित शहा संघभूमीत, सरसंघचालकांची घेणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 01:08 PM2018-03-04T13:08:55+5:302018-03-04T13:08:55+5:30
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे रविवारी संघभूमीत आगमन झाले. यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्यासह संघ पदाधिका-यांची भेट घेणार आहेत.
नागपूर : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे रविवारी संघभूमीत आगमन झाले. यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्यासह संघ पदाधिका-यांची भेट घेणार आहेत. त्रिपुरामधील विजयानंतर दुस-याच दिवशी शहा नागपुरात येणार असल्याने राजकीय वर्तुळाचे या भेटीकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे पुढील आठवड्यात संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभादेखील सुरू होणार आहे.
संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला ९ मार्चपासून रेशीमबाग येथे सुरुवात होत आहे. या निमित्ताने संघाचे अनेक जेष्ठ पदाधिकारी नागपुरातच आहेत. त्यातच त्रिपुरात भाजपाच्या विजयामुळे संघ मुख्यालयातदेखील आनंदाचे वातावरण आहे. मेघालयमध्ये कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. कॉंग्रेस तेथे सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी त्रिशंकू परिस्थितीमुळे तेथे सत्तास्थापनेसाठी भाजपचा पूर्ण प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर शहा यांची भेट महत्त्वाची मानण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहा यांचे रविवारी दुपारी १२ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.अजय संचेती, आ.सुधाकर कोहळे, आ.कृष्णा खोपडे, आ.गिरीश व्यास, महापौर नंदा जिचकार यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. दुपारनंतर शहा संघ मुख्यालयात जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शहा यांच्या भेटीचा अनोखा योगायोग
२०१५ साली नागपुरात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत अमित शहा सहभागी झाले होते. त्या बैठकीच्या ६ दिवस अगोदर अमित शहा यांना ऐन धुळवडीच्या दिवशी संघ मुख्यालयात बोलविण्यात आले होते. यंदादेखील अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या काही दिवस अगोदर शहा नागपुरात येत आहेत.